Pimpri

कुदळवाडीतील नागरिकांची पायपीट थांबणार; आधार केंद्राला शासनाची मान्यता..

By PCB Author

September 20, 2021

– आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते केंद्राचे कुदळवाडीत उद्घाटन..

पिंपरी,दि. २० (पीसीबी) :- चिखलीतील कुदळवाडी परिसर महापालिकेत समाविष्ट होऊन कित्येक वर्ष लोटले तरीही, अद्याप येथील मुलभूत समस्या सुटत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे. केंद्र सरकारने आधारची सक्ती केलीय. मात्र, परिसरात आधार केंद्रच नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती.

कुदळवाडीतील मनपा शाळा या ठिकाणी आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. शासनाच्या कोविड नियमांचे पालन करून आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते या आधार केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यावेळी कुदळवाडी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

गावची लोकसंख्या काही हजाराच्या घरात असून येथे ग्रामस्थांबरोबरच परप्रांतीय नागरिक देखील वास्तव्यास आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथे आधार केंद्र नसल्याने नवीन आधार, आधार दुरुस्ती आदी कामासाठी त्यांना इतर ठिकाणी पायपीट करावी लागत होती. आधार केंद्र सुरू करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्नशील होतो. या प्रयत्नाला अखेर आमदार महेश लांडगे यांच्या मदतीने यश मिळाले असून, कुदळवाडीतील मनपा शाळा कार्यालयात सोमवारपासून आधार केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रावर नवीन आधारकार्ड बनवणे, आधारकार्डमधील दुरुस्ती, स्मार्ट आधारकार्ड यासारख्या सुविधा पुरविण्यात येतील. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘ फ ‘ प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केले आहे.