Desh

कुत्र्याच्या नावावर ‘तो’ वर्षभर रेशन घेत होता

By PCB Author

September 26, 2018

इंदूर, दि.२६ (पीसीबी) – भारतात सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘काहीही’ केले जाऊ शकते याचा प्रत्यय मध्य प्रदेशात सरकारी अधिकाऱ्यांना आला आहे. रेशन कार्डाच्या सहाय्याने एक वृध्द व्यक्ती त्याची मुलगा राजू याच्या नावावर गेले वर्षभर रेशन घेत होता. पण राजू हा त्यांचा मुलगा नसून त्यांच्या पाळीव कुत्र्याचे नाव असल्याची धक्कादायक माहिती आता उघडकीस आली आहे.

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात एक दुर्गम गावात हा प्रकार घडला आहे. नरसिंह गेल्या वर्षभरापासून रेशनच्या दुकानातून त्यांचा पाळीव कुत्रा राजूच्या नावावर ६० किलो गहू आणि तांदूळ स्वस्त दरात विकत घेत होते. सरकारी अधिकारी नरसिंह यांच्या घरी पडताळणीसाठी गेले असताना ही बाब उघडकीस आली. रेशन कार्डावर नमूद असलेल्या व्यक्तींची अधिकाऱ्यांनी विचारपूस केली असता नरसिंह आणि त्यांची पत्नी समोर आली. पण राजूला बोलवण्यात आले आणि कुत्रा समोर येताच अधिकाऱ्यांना धक्काच बसला.

अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रेशन कार्ड हे स्थानिक पंचायत समिती कार्यालयातून देण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.