“कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो हे लक्षात असू दे”

0
228

मुंबई, दि.११ (पीसीबी) : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. मुंबई महापालिकेने नालेसफाईचे केलेले दावे फोल ठरले असून मुंबईमध्ये सगळ्यांचीच तारांबळ उडाली. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सर्व रेल्वे सेवा ठप्प झाल्या. साचलेले पाणी, खड्डे यांमुळे रस्त्यावरील वाहने तासनतास एकाच जागी उभी होती. दरम्यान या सर्व प्रकारावरून भाजपाने शिवसेनेवर तिकाबान सोडले. नालेसफाईच्या कंत्राटांमध्ये गेल्या पाच वर्षांत एक हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोपही भाजप आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी बुधवारी केला. दरम्यान या सर्व टीकेला उत्तर देताना महापौरांनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विरोधी पक्षाकडून मालाड इमारत दुर्घटनेमुळे आणि पावसातल्या महापालिकेच्या नियोजनामुळे मोठ्या प्रमाणावर टीका असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी, भाजपाला वाट्टेल ते बरळण्याचा पूर्व अधिकार आहे, ते स्वप्नात आहेत म्हणून बरळत आहेत. त्यांनी भो भो करत राहावं, असं उत्तर दिलं होतं. असं मुंबई महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या. यावर उत्तर देत अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं असून, “माननीय महौपार किशोरी पेडणेकर यांचं हे वक्तव्य त्यांचे संस्कार आणि पक्षाची संस्कृती दाखवणारे आहे. महत्वाचे म्हणजे कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो हे लक्षात असू दे,” असा टोला लगावला आहे.