Pune

कुठेही जा तू स्वप्नाली, मी तुला राहू देणारच नाही; हडपसरमधील पत्रकामुळे खळबळ

By PCB Author

December 05, 2018

पुणे, दि. ५ (पीसीबी) – ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’ या फलकाचे कोडे उलगडल्यानंतर आता पुण्यातील हडपसरमध्ये ठिकठिकाणी लागलेल्या एका पत्रकांमुळे  एकच खळबळ उडाली आहे. या पत्रकांबाबत  नागरिकांतून उलटसुलट तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पत्रकांत ‘कुठेही जा तू स्वप्नाली, मी तुला राहू देणारच नाही’, असा मजकूर लिहिण्यात आला आहे. 

आज (बुधवारी) हडपसरमध्ये ठिकठिकाणी भिंतीवर आणि विजेच्या खांबावर ही पत्रके ठिकठिकाणी लावल्याचे नागरिकांना दिसून आले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पत्रक काढून टाकली. दरम्यान ही पत्रके कोणी लावली याबाबत कोणतीच माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या पत्रकामध्ये तरुणीबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला आहे. तुझ्याशी मी लग्न केलं, पण तू आता मला सोडून दुसऱ्यासोबत निघून गेली आहेस, असा मजकूर आकाश नावाच्या तरूणांने लिहिला आहे. त्यामुळे  प्रेमाच्या त्रिकोनातून हा प्रकार घडला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.