कुठले मिशन ? कोरोनामय महाराष्ट्राचे ? – शिवराय कुळकर्णी, प्रदेशप्रवक्ता, भाजपा

0
362

प्रतिनिधी, दि.२(पीसीबी) – Mission begin again ! पुनश्च हरी ओम !! काय सुखावह वाटतं ऐकून ! असं वाटलं की हे उच्चारल्या नंतर नायक सिनेमातील अनिल कपूर प्रमाणे उद्धवजी यंत्रणा घेऊन रस्त्यावर उतरतील.. फटाफट निर्णय होतील.. समोर पित्यापेक्षा वेगाने आदित्य धावताना दिसतील.. यंत्रणा चुस्त झालेली.. मंत्रालय सुरू झालेले… रुग्णांना बेड उपलब्ध होत आहेत…पवार साहेब कोरोनावर मात करण्याचे सल्ले देत आहेत… संजय राऊत करिमलाला ऐवजी कोरोना लढ्यावर बोलताहेत.. आघाडीचे मंत्री एकेका रुग्णासाठी धडपड करत आहेत… कदाचित साऱ्या महाराष्ट्रासमोर असेच चित्र उभे ठाकले असणार !

मन मागे वळून महाराष्ट्राची कोरोना लढाई पाहू लागले. मुख्यमंत्री मातोश्रीवर कोरोन्टाईन होते. महाराष्ट्र ढासळत होता. मग mission पुन्हा सुरू होणार म्हणजे काय होणार ? कुठले mission ? आता पर्यंत राबवले तेच की मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात आणखी काही नवे आहे ? हो ! म्हणायला यावेळच्या फेसबुक लाईव्ह मध्ये थोडा नवेपणा दिसला. मुख्यमंत्र्यांनी चक्क कोमट पाण्याला फाटा दिला होता. भाषणात सायन्स आणि आर्टस् हे दोन नवे मुद्दे होते. पण राज्याच्या सायन्स आणि आर्ट्स ला कॉमर्सची जोड लागते, त्या कॉमर्स विषयी अवाक्षरही नव्हते. आकडे आहेत माझ्याजवळ असे सांगत ‘सामना’ ने प्रकाशित केलेले आकडे त्यांनी वाचले देखील. तसेही त्यांना सामना शिवाय पर्याय नव्हता. कारण बाकी वृत्तपत्रांसोबत कोरोना आला आणि त्याची सोबत जगण्याची तयारी नसेल तर केवढा अनावस्था प्रसंग ओढवायचा !

कसले आले मिशन ? महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढतेच आहे. 70 हजारावर रुग्णसंख्या पोहचली. दुर्दैवाने राज्य सरकार गंभीर नाही. सचिन, लक्ष्या आणि अशोक सराफ या त्रयीला मागे टाकेल अशी सरस ‘बनवा बनवी’ करणारी त्रयी फेकाफेकी करण्यात मस्त आहे. कोरोना या विषयावर महाराष्ट्र धास्तावला असताना, चिंतीत असताना, नेमका हाच विषय बाजूला ठेऊन बोलायचे, हे सतारुढ तिघाडीने ठरवले आहे. ‘आम्ही जबाबदारी घेतली आहे, तुम्ही खबरदारी घ्या’ हे अर्धसत्य आहे. यातील तुम्हीच खबरदारी घ्या, हेच पूर्ण सत्य आहे. न घेतल्यास कोरोनाची लागण आणि त्याहीपेक्षा भयंकर अव्यवस्थेच्या यातना आपल्या नशिबी येणार आहेत.

मुख्यमंत्री प्रत्येक लॉक डाऊनच्या प्रारंभाला फेसबुक वर येऊन बोलतात. किंवा मोदीजी बोलले की त्यांना बोलावेच लागते. प्रारंभीच्या काळात मुख्यमंत्री धोरणी व गंभीर असल्याचे लोकांचे मत होते. मात्र, तो गैरसमज दूर व्हायला वेळ लागला नाही. कोरोनाचे पहिले दोन महिने ‘राजकारण करु नका’ या घोषवाक्यावरच त्यांनी काढले. कोणीही व्यवस्थेवर बोट ठेवायचे नाही. कोणीच दोष दाखवायचे नाही. मागणी करायची नाही. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला तुम्ही राजकारण करता आहात, असे म्हणून बदनाम करण्याची राज्य सरकारने मोहीम राबवली. याच काळात जे काही विपरीत घडते आहे, ते मोदीजी आणि केंद्रामुळे घडते आहे, याचा सपाटा सुरू ठेवला. मराठी इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्याला साथ दिली. कोणीही कोणताही प्रश्न विचारला की भाजपा राजकारण करते आहे, हे सत्ताधाऱ्यांपेक्षाही तीव्र अविर्भावात आणि कमालीच्या अभिनिवेशात अँकरच बोलत होते. सामान्य माणसालाही असे वाटायचे की चेहऱ्यावरून भोळाभाबडा दिसणाऱ्या नेत्याला काम करू दिले पाहिजे. भाजपा एवढ्याचसाठी शांत होता, की कोरोनाचे संकट आले असताना राजकीय डावपेच कशाला करायचे ? आजही भाजपा सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात नाही. देवेन्द्रजी फडणवीस कोरोनावरच बोलतात. आम्हा सर्व भाजपा कार्यकर्त्यांची कोरोनावरच बोलण्याची इच्छा आहे. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आणि राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आमचा तो अधिकार आहे. पण दुर्दैव राज्य सरकार कोरोनावर बोलत नाही आणि त्यांना बोलायचेही नाही. मिशन राबवायचे असेल तर महाराष्ट्र सावरावा लागेल.

मुख्यमंत्री कोरोनावर बोलताना वारंवार कोमट पाणी, मास्क, गुणाकार, भागाकार, वजाबाकी, हाथ धुणे हेच विषय हाताळणार आहेत का ? आता लोक कंटाळले. हसू न येणारे चुटके, खुशालचेंडू संवाद, जबाबदारी न स्वीकारता मरणारच, करणारच, देणारच असे ‘च’ लावून व्यक्त केलेले पोकळ निर्धार, कॅरम, पत्ते, गाण्याच्या भेंड्या आणि तीच ती उदाहरणे लोकांनी किती वेळा ऐकायची ? कुठलाच आराखडा नाही. आर्थिक नियोजन नाही. रोडमॅप किंवा निलचित्र नाही. मदतीचे पॅकेज नाही. भविष्यातील योजना नाहीत. मंगल कार्यालयाचेच रुग्णालय होईल. रुग्णालयाचेच सभागृह होईल. पण कधी ? केव्हा ? त्याचा आता कोरोना थांबवण्यासाठी काय उपयोग ? 31 मे ला कोरोना हद्दपार करायचाच… होणारच… पावसाळ्यात रुग्णसंख्या वाढू शकते… शाळा सुरु कराव्याच लागतील… मला खात्री आहे, होणारच.. वादळ येणार… येणार नाही.. जाणार… अशा परस्परविरोधी विधानांचा भडिमार एवढा सहज कसा करता येऊ शकतो ? कुठेच गंभीरता नाही. या सरकारमध्ये गंभीर मिशन कोणते असेल तर ते म्हणजे कसेही करून मोदी, फडणवीस आणि भाजपाला विरोध करणे, बदनाम करणे. आपण महाराष्ट्रीय जनतेला कोरोना विरोधात लढायचे आहे आणि महाविकास आघाडीला भाजपा विरोधात लढायचे आहे. असेच असेल तर संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामय मिशनच्या दिशेने आपण जातो आहोत, हे खेदाने म्हणावे लागते.

*खोटारडेपणाचा कळस !*
महाराष्ट्राची कोरोना संबंधित फजिती लपवण्यासाठी चक्क खोटारडेपणाचा कळस गाठला आहे. संजय राऊत या मिशनचे सेनापती आहेत. कोरोनावरून लोकांचे लक्ष उडावे यासाठी तासागणिक ते माकडचेष्टा करत असतात. या मिशनमध्ये जितेंद्र आव्हाड अग्रणी आहेत. द्वेषमूलक भाषेचा वापर करून लोकांचे कोरोनावरून लक्ष हटवून नवे वाद निर्माण करण्यात ते पटाईत आहेत. ऊर्जा मंत्री नितीन राऊत, सचिन सावंत, हसन मुश्रीफ, नवाब मलिक आणि यांच्या दिमतीला असलेल्या paid trollers ची फौज कोरोना सोडून बोलतात. खरे तर आव्हाडांनी कोरोनाचे दुःख भोगले आहे. त्यावेळी सर्वांनी सदिच्छा व्यक्त केल्या. पण दुर्दैवाने नंतर ते अधिक द्वेषमूलक विधाने करताहेत. यांच्या धादांत खोटारडेपणाची काही उदाहरणे पाहा. मुंबई पॅटर्न देशभर राबवणार, ही पुडी सोडून दोन दिवस महाविकास आघाडीने पाठ थोपटून घेतली. मग गुजरातवर मोर्चा वळवला. महाराष्ट्रापेक्षा गुजरातची अवस्था वाईट आहे असा खोटा आभास रंगवण्याचा योजनापूर्वक प्रयत्न यांनी केला. विविध वृत्तपत्रांच्या नावाचा वापर करून खोटी माहिती पसरवली. महाराष्ट्राचे राज्यपाल, रेल्वे मंत्रालय अशा अनेक विषयांवर खोटी माहिती पेरून राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला. या मागचे कारण काय, तर कोरोनावर बोलू नका. कारण, त्यावर या सरकार जवळ उत्तर नाही. औरंगजेबाच्या घोड्यांनाही पाणी पिताना त्यात संताजी – धनाजी दिसायचे. हीच अवस्था आघाडीची आहे. संताजी – धनाजीची जागा देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांनी घेतली आहे. कोरोनाच्या अपयशावर उत्तर नाही म्हणून खालच्या स्तरावर देवेंद्रजींवर टीका करायची, त्यांना ट्रोल करायचे, हेच आघाडीने ठरवले आहे. यांच्यात धमक असेल तर यांनी आमने सामने करावे. कारण फडणवीसांजवळ दूरदृष्टी आहे. करून दाखवण्याची जिद्द आहे. नियोजन आहे. अभ्यास आहे. कोरोनाला न घाबरता कोविड वार्डापर्यंत धडकण्याची हिंमत आहे. ती हिंमत यांच्यात नाही. हे घरच सोडायला तयार नाहीत. मुंबईत कोरोना रुग्णाला बेड उपलब्ध नाही. प्रेतांचा खच आहे. राज्यभर परिस्थिती बिघडत चालली. ज्यांनी कान उपटायचे ते शरदराव पवारही फक्त आणि फक्त केंद्राला दोष देत महाराष्ट्राची दुरवस्था झाकून ठेवण्यात दंग आहेत.

*पोलिसांची स्थिती वाईट !*
देशातील कोण्याच राज्यात झाली नाही एवढी पोलिसांची वाईट स्थिती महाराष्ट्रात झाली. 2,509 पोलिस कोरोनाग्रस्त आहेत. 26 पोलिसांना प्राण गमवावे लागले. जे पोलीस कोरोना लढाईतील आघाडीचे शिलेदार आहेत, त्यांची अशी दुर्दशा होण्याची कारणे शोधली तर त्याला शासकीय धोरणच जबाबदार असल्याचे जळजळीत वास्तव आहे. लॉक डाऊन सुरू होताच पहिला आठवडा पोलिसांनी धाक निर्माण केला होता. मात्र, वोट बँकांच्या लालसेपोटी पोलिसांना कारवाई करण्यापासून रोखले गेले. याचा दुष्परिणाम म्हणजे अनेक ठिकाणी पोलिसांवर दगडफेक झाली. त्यांच्या डोळ्यादेखत समूहांनी धमक्या दिल्या. पोलिसांवर हल्ले झाले. झुंडीच्या झुंडी अनियंत्रित झाल्या. गैरव्यवस्थेपायी व शासकीय यंत्रणेचे अस्तित्व नाही म्हणून अनेक समूह रस्त्यावर आले. कंटेन्मेंट झोन वैगेरे शब्द कागदावरच होते. शासनाच्या बेवळणी कारभारामुळे रस्त्यावर आलेले झुंड स्वतःचा जीव धोक्यात टाकून आवरावे लागले पोलिसांनाच. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सोशल डिस्टनसिंग महत्वाचे असताना बेकाबू जमावांना धरून धरून वठणीवर आणण्याचे काम पोलिसांना करावे लागले. यात कायदा व सुव्यवस्था सांभाळणारी राज्याची अत्यंत महत्वपूर्ण यंत्रणा गारद झाली. दिवसागणिक पोलिसांचे कोरोनाग्रस्त होण्याचे आकडे वाढताहेत. त्यात काही पोलिसांच्या मृत्यूच्या हृदयद्रावक कथा जीव पिळवटून टाकणाऱ्या आहेत. एकीकडे कायदा तोडणाऱयांवर कारवाई करण्याची मोकळीक नाही आणि दुसरीकडे सरकारवर टीका करणाऱयांवर कारवाया करण्याचा तुघलकी कारभार गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात पाहायला मिळतो आहे. महाराष्ट्राची अवस्था अधिक खालावत असताना पोलीस यंत्रणाच गलितगात्र असेल तर राज्याचे काय होईल याची थोडीही चिंता राज्य सरकारला नाही. शेवटी हे ही आपलेच दुर्दैव !

*हेच का मिशन ?*
कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून चे सोडा फक्त दोन दिवसातील केवळ मुंबईच्या घटना नजरेसमोरून घाला. आयुष्यभर रुग्णांची सेवा करणारे तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा मुंबईत करोनाने मृत्यू, तब्बल 10 तास बेड मिळाला नाही. आधीच खासगी हॉस्पिटल ताब्यात घ्यायला दोन महिने उशीर केला, आता आरोग्यमंत्री म्हणतायत की हॉस्पिटल बेड द्यायला तयार नाहीत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार अशा लोकांना तुरुंगात धाडायला तुम्हाला कोणी अडवलं आहे ? मुंबई महापालिकेच्या सर्वात मोठ्या आणि सर्वात सुसज्ज हॉस्पिटलमध्ये परिचरिकांच्या कोविड-19 च्या चाचण्या होत नाहीत, त्यांना आंदोलन करावे लागते. ही आहे यांची कार्यक्षमता.महाराष्ट्रातून मजुरांसाठी पाठवलेल्या 100 ट्रेन रिकाम्या जातात. कोरोना वॉरीअर्सला वेळेवर अँबुलन्स मिळत नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 खात्यात देणगीदारांच्या मदतीने 342 कोटी रुपये जमा करण्यात आले असताना प्रत्यक्षात कोविडच्या नावावर केवळ 23.82 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आरटीआय अंतर्गत उघड होते. विरोधीपक्ष नेत्याला साकडे घातले म्हणून हवालदाराची तात्काळ बदली केली जाते. हेच आहे का तुमचे मिशन ? असेच मिशन पुन्हा वेगाने राबवणार का, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. उघडा,उघडा, बंद करा, बंद करा… निर्णय करा, लगेच मागे घ्या… असला भोंगळ कारभार थांबवा. तुम्हाला महाराष्ट्राची कळकळीची विनंती आहे. हवे तसे राजकारण करा पण सामान्य माणसाचा जीव वाचवणारे मिशन राबवा ! आमच्याजवळ ते काय 125, 146 किंवा 185 कोटी ( विविध वृत्तपत्रात विविध आकडे होते ) ची व्यवस्था नाही. रोज कमवून खाणाऱ्यांच्या जीवाशी खेळू नका, म्हणजे झालं !