‘कुठलेही सरकार आले तरी ते काँग्रेस-राष्ट्रवादीचेच असेल!’

0
359

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – भाजप-सेनेत इतक्या नेत्यांचे पक्षांतर झाले आहे की विधानसभेच्या निवडणुकीनंतर कोणाचेही सरकार आले तरी ते सरकार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचेच असेल. आमच्याकडील  वाईट समजले जाणारे, व आरोप करण्यात आलेले नेते त्यांच्याकडे गेले की ‘क्लिन’ कसे ठरतात?. भाजपकडे अशी कोणती ‘वॉशिंग पावडर’ आहे, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नगरमध्ये  शुक्रवारी केली.

राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्या संवाद यात्रेची सुरुवात नगरमधून झाली. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधत राष्ट्रवादीची भूमिका मांडली, तत्पूर्वी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. राज्यातील १५ जिल्ह्य़ात त्यांची संवाद यात्रा जाणार आहे. सभा न घेता, विविध घटकांशी त्या संवाद साधणार आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजश्री घुले, शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे आदी यावेळी उपस्थित होते.

पूर्वी नागरिकांना ईडी, सीबीआय हे शब्द माहिती नव्हते, आता त्याचा उपयोग दडपशाहीसाठी केला जात आहे. सत्ता आमचीही होती, परंतु असा दुरुपयोग कधी पूर्वी झालेला नाही. आता विधानसभा निवडणुका आल्या, की ईडी, सीबीआय यांच्या नोटिसा यायला लागतात.  ईडी, सीबीआय, बँका व कारखाने या चार घटकांमुळेच भाजपमध्ये प्रवेश होतो आहे. जे जातात, त्यांना माझ्या शुभेच्छा, परंतु मधुकर पिचड यांच्यासारखे नेते जातात, त्याचे दु:ख होते. पिचड यांना आम्ही आमच्या कुटुंबातील मानले होते. परंतु पवार कुटुंबीयांनी सोडुन जाणाऱ्यांबद्दल कधी कटुता ठेवली नाही, पलटवारही केलेला नाही, ती आमची संस्कृती नाही. परंतु सध्या दडपशाहीच्या राजकारणाची संस्कृती वाढत आहे, अशी टीकाही खा. सुळे यांनी केली. कितीही जण पक्षाला सोडून गेले तरी राष्ट्रवादी पुन्हा जोमाने उभी राहील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.