कुकडी कालव्यातून पाणी सोडण्यासाठी सुरू केलेले माजी मंत्र्यांचे उपोषण मागे

0
238

अहमदनगर, दि. २ (पीसीबी) : कुकडी कालव्यातून उन्हाळी आवर्तन मिळण्यासाठी माजी मंत्री राम शिंदे यांनी सुरु केलेले उपोषण मागे घेण्यात आले. येत्या 15 जूनला पाणी सोडणार असल्याचे आश्वासन कार्यकारी अभियंत्याने दिल्यानंतर राम शिंदे यांनी आपले उपोषण 24 तासात मागे घेतले आहे. दरम्यान, याच मागणीसाठी शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनीही अजित पवार यांना फोन केला होता, मात्र आपण वरिष्ठांच्या कामात लक्ष घालत नाही असे सांगत पवार यांनी टोलवले होते.

कुकडी कालव्यातून मिळणाऱ्या पाण्याचा कर्जत जामखेड श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील पिकांसाठी उपयोग होतो. पिण्याचे पाणी, फळबागा आणि चारा पिके यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून कुकडी कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडावे या मागणीसाठी माजी मंत्री राम शिंदे यांनी उपोषण सुरु केले होते.
15 जूनला पाणी सोडणार असल्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने राम शिंदे यांनी आपले उपोषण मागे घेतले. काल सकाळी अकरा वाजता कर्जतमधील तहसील कार्यालयासमोर त्यांनी उपोषण सुरु केले होते. लॉकडाऊनच्या काळात पाण्याच्या प्रश्नावरून भाजपचे आजी-माजी आमदार महाविकास आघाडीच्या विरोधात आक्रमक झालेले दिसले. श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनीही उपोषण सुरू केलं होतं.
कुकडीच्या पाण्यावरुन राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कालच राम शिंदेवर टीका केली होती. पाच वर्षात यांना नियोजन करता आले नाही. कुकडीच्या इतिहासात दोनदा आवरण सोडले. मात्र मंत्री असून पाच वर्षात काय नियोजन केले? असा सवाल रोहित पवारांनी विचारला.
कुकडी अवर्तन सोडण्यासाठी एका शेकऱ्याने (मारुती भापकर) उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट कॉल केला होता. दोघांच्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली होती. “कुकडी आवर्तन पंधरा दिवसांनी सोडणार असं म्हणताय, ते ऊस पीक जळून चालले आहे” असं शेतकरी म्हणाला होता. त्यावर “मी कुठल्याही वरिष्ठ खात्याच्या मंत्र्यांच्या कामात लुडबुड करत नाही. ते खाते माझ्याकडे नाही. जयंत पाटलांकडे आहे, ते प्रांतअध्यक्ष आहेत. ते जेव्हा मिटिंग घेतात, तेव्हा मी लुडबुड करत नाही, जयंत पटलांशी बोलावं लागेल, राहुल जगताप यांना त्यांच्याशी बोलायला सांगा, असं अजित पवार शेतकरी मारुती भापकर यांना म्हणाले होते.