“कीर्तनकारांबद्दल माझ्या मनात सन्मानच; पण अंधश्रद्धा पसरवणं अत्यंत दुर्दैवी”

0
527

अहमदनगर,दि.१६(पीसीबी) – किर्तनकारांबद्दल माझ्या मनात नेहमी सन्मानच आहे. माझी श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशी अंधश्रद्धा पसरवली जाणं अत्यंत दुर्दैवी आहे, असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदुरीकरांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.

प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात चांगलेच अडकले आहेत. अनेकांनी या वादावर भाष्य केलं आहे. एकीकडे त्यांना पाठिंबा दिला जातोय तर दुसरीकडे त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. यातच आता सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रात वाढते महिला अत्याचार हा सामाजिक प्रश्न आहे. फक्त कायदे कडक करुन हा प्रश्न सुटणार नाही. समाजात प्रबोधन करण्याची गरज आहे. घरगुती अत्याचार का घडत आहेत याचा विचार करण्याची गरज असल्याचंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, आम्ही नरेंद्र दाभोळकरांच्या, यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात वाढलोय. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात अशी अंधश्रद्धा पसरवणं दुर्दैवीच असल्याचं परखड मत सुळेंनी मांडलं आहे.