किरीट सोमय्या यांनी भुजबळ, राणे, पवार, तटकरे, कृपाशंकर यांच्यावरही गंभीर आरोप केले, पुढे काय झाले…

0
515

मुंबई, दि. २१ (पीसीबी) : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोपांची अक्षरशः राळ उठवली आहे. सोमय्यांनी या प्रकरणी ईडीकडे तक्रारीही केल्या आहेत. त्यामुळे आघाडीत मोठी खळबळ उडाली असून राज्याचे राजकारण चांगलंच तापलं आहे. यापूर्वीही सोमय्या यांनी छगन भुजबळ, नारायण राणे, अजित पवार, सुनिल तटकरे, कृपांकर सिंह, बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित अशा विविध मोठ्या नेत्यांवरही गंभीर आरोप केले होते. या आरोपांचं काय झालं ? त्याचा घेतलेला हा आढावा.

माजी मंत्री कृपाशंकर यांच्यावरील ते आरोप –
किरीट सोमय्या यांनी सर्वात आधी बॉम्ब टाकला तो तत्कालीन गृहराज्यमंत्री आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्यावर. सोमय्यांनी कृपशांकर यांचा थेट झारखंडचे घोटाळेबाज माजी मुख्यमंत्री मधू कोडांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा हा आरोप होता. सोमय्या केवळ आरोप करून थांबले नाहीत तर त्यांनी 2009 मध्ये थेट कंपनी अफेयर्स खाते आणि ईडीकडे तक्रार केली. कोकणात शेकडो एकर जमीन खरेदी केल्याचे कृपाशंकर सिंह यांचे प्रकऱणही त्यावेळी गाजले होते. मात्र, 7 जुलै 2021मध्ये सिंग भाजपमध्ये आले. त्यानंतर या आरोपावर कुणीही वाच्यता केली नाही. सिंग हे आता भाजपचे मुंबईचे उपाध्यक्ष असून आगामी महापालिका निवडणुकीत सिंग यांचा भाजपला फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

भुजबळांवर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोप –
सोमय्यांनी आरोप केलेलं आणि गाजलेलं प्रकरण म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळा. सोमय्यांनी थेट राष्ट्रवादीचे बडे नेते छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोप केला होता. तसेच या प्रकरणात शेल कंपन्यांच्या मार्फत शेकडो कोटींचे मनी लॉन्ड्रींग केल्याचा दावाही त्यांनी केला होता. सोमय्यांच्या आरोप आणि तक्रारीनंतर 2016 मध्ये या प्रकरणी छगन भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळांना अटक झाली होती. अटकेनंतर भुजबळ सुमारे 18 महिने तुरुंगात होते. सध्या सत्र न्यायालयाने भुजबळांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून मुक्त केलं आहे. ते महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सिंचन घाटाळ्याचे आरोप आणि क्लीन चिट –
सोमय्या यांनी राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांवर आरोप केला होता. त्यांनी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर 800 कोटीच्या मनी लँडरिंगचा आरोप केला होता. या प्रकरणी सोमय्यांनी एसीबीकडे धाव घेतली होती. सिंचन घोटाळ्याप्रकरणी एफए कन्स्ट्रक्शन कंपनीतून पैसे वळवण्यात आल्याचा आरोप पवारांवर करण्यात आला होता. मात्र, मधल्या काळात अजित पवार यांच्यासोबत भाजपनं 80 तासाचं सरकार स्थापन केलं. त्याच काळात अजित पवारांना एसीबीनं क्लीन चीट दिली होती. सध्या पवार महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री आहेत.

आरोपानंतर बबनराव पाचपुते भाजपमध्ये –
सोमय्या यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे तेव्हाचे दुसरे नेते बबनराव पाचपुतेही अडचणीत आले होते. 2015 मध्ये भरभक्कम परतावा देण्याच्या नावाखाली राज्यात 26 पॉन्झी स्कीम्स चालवून त्यामाध्यमातून 10 लाख लोकांची फसवणूक झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. पाचपुतेंमुळेच हे प्रकरण दाबलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यात पाचपुतेंचा हात असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला होता. 2014 च्या निवडणुकीआधीच बबनराव पाचपुते यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र त्यांना निवडणूक जिंकता आली नाही.

नारायण राणेंवर आरोप आणि भाजप प्रवेश –
सोमय्यांनी काँग्रेसचे तत्कालीन नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावरही अत्यंत गंभीर आरोप केला होता. ही 2017ची घटना. सोमय्यांनी राणेंवर 300 कोटींच्या मनी लँडरिंगचा आरोप केला होता. अविघ्न रिअल इस्टेटचे कैलाश अग्रवाल यांच्या कंपनीशी हातमिळवणी करून राणेंनी 300 कोटी रुपये रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये वळवल्याचा आरोप त्यांनी केला होता. मधल्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राणेंनी काँग्रेस सोडून स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. नंतर हा पक्ष भाजपमध्ये विलीन केला. त्यानंतर भाजपने राणेंना राज्यसभेवर पाठवलं. सध्या राणे केंद्रात सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री आहेत.

गावितांवर गंभीर आरोप, नंतर भाजपमध्ये
सोमय्या यांनी आणखी एक माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्यावर आरोप केला होता. 2004 ते 2012 या काळात आदिवासी विकास खात्यातील विविध सरकारी योजनांमध्ये 6 हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप हा आरोप होता. गंभीर तक्रारीनंतरही 2009 पासून गावितांची चौकशी पेंडिंग ठेवल्याबद्दल सोमय्यांनी तेव्हाच्या आघाडी सरकारला धारेवर धरले होते. 2014 च्या निवडणुकीआधी विजयकुमार गावित भाजपात दाखल झाले. त्यांना तिकीटही मिळालं आणि त्यांची मुलगी दोनदा खासदार म्हणून निवडूनही आली. त्यानंतर गावितांवर पुन्हा आरोप झाले नाहीत.

आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि … –
नारायण राणे, कृपाशंकर सिंह, अजित पवार, छगन भुजबळ व समिर भुजबळ, बबनराव पाचपुते, गावित यांच्यानंतर आता सोमय्या यांनी आताच्या महाआघाडीतील आजी-माजी मंत्र्यांपैकी अनिल देशमुख, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, रविंद्र वायकर, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड यांची शिकार करण्यासाठी हाकारे द्यायला सुरवात केली आहे. थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या १९ बेनामी बंगल्यांची यादी असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. अलिबाग येथील जमीन घोटाळ्याबाबतही सोमय्या यांनी वाच्यता केली आहे. शिवेसनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर पीएमसी बँकेच्या ५० लाख रुपये प्रकऱणात आरोप केला होता.
शिवसेनेचे ठाणे शहरातील आमदार प्रताप सरनाईक यांच्याबद्दल १५० कोटींच्या मालमत्तेबाबत, तर खासदार भावना गवळी यांनी कारखान्याच्या माध्यमातून १०० कोटी रुपयेंचा घोटाळा केल्याचाही गौप्यस्फोट सोमय्या यांनी केला आहे. मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या मुलाचे कोरोना काळातील कंत्राट, एसआरए जमीन प्रकऱणातही सोमय्या यांनी शिवेसनेला सळो की पळो केला आहे.

युतीची चर्चा जोमात –
किरीट सोमय्या यांनी आरोप सुरू करताच दुसऱ्या बाजुने शिवसेनेची भाजपा विरोधातील धार बोथट झाली आहे. शिवेसनेतील असंख्य नेत्यांमध्ये आता एक मतप्रवाह युती सरकराच्या बाजुचा आहे. दुसऱ्या बाजुने भाजपाचे बडे नेतेसुध्दा आता शिवसेनेच्या बाजुने बोलू लागलेत. सोमय्या यांनी आरोप करायचे आणि कालांतराने ईडी, इनकमटॅक्स छापे पडतात आणि त्रासलेले पुढारी भाजपा प्रवेश करतात, असा ट्रेंड आहे. जे बधत नाहीत त्यांना त्रास देण्याची मोहिम सुरू राहते आणि जे भाजपामय होतात त्यांच्या प्रकरणांवर पुढे कुठलिही वाच्यता होत नाही. ही मोडस ऑपरेंडी लक्षात आल्याने सावध झालेले काही बडे नेते आता सावध झाले आहेत. अजित पवार यांनी त्याच दबावापोटी एका रात्रीत भाजपाशी संग केला होता, पण शरद पवार यांनी त्यांना परत आणले. आता पुन्हा अजित पवार यांची चौकशी सुरूच असल्याचे पालपूद भाजपाने लावले आहे. दुसरे बडे नेते छगन भुजबळ यांच्या पाठिशी खुद्द शरद पवार भक्कमपणे उभे राहिले म्हणून ते राष्ट्रवादीत कायम आहेत. सोमय्या यांनी केलेल्या विविध आरोपांपैकी एकाही प्रकऱणात कोणालाही शिक्षा झालेली नाही, असे चित्र आहे.