किरीट सोमय्यांचा मोठा आरोप, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ ED च्या रडारवर

0
209

मुंबई, दि.५ (पीसीबी) : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची ईडी चौकशी होण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचा दिग्गज नेता ईडीच्या रडारवर असल्याचं सूतोवाच केलं होतं. त्यानंतर सोमय्यांनी पत्रकार परिषदेत अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे थेट नाव घेत आरोप केले. अडसूळांची तक्रार रिझर्व्ह बॅंकेकडे करणार असल्याचंही सोमय्यांनी सांगितलं. त्यामुळे मिसेस वर्षा संजय राऊत यांच्यानंतर आता अडसूळ अंमलबजावणी संचालनालयाच्या निशाण्यावर येण्याची चिन्हं आहेत.

सिटी को ऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. “बॅंकिंग क्षेत्रात जे खूप मोठ्या बाता करतात, त्यांच्याकडे पीएमसी बँकेचे पैसे पोहोचले आहेत. काही महिन्यांपूर्वी सिटी बॅंकेचे गुंतवणूकदार आले होते, आनंदराव अडसूळ यांचा विषय पुढे लावून धरणार. पीएमसी बॅंक असो किंवा सिटी बॅंक, दोषींवर कारवाई होणार” असा इशारा सोमय्यांनी दिला. आनंदराव अडसूळांबद्दल आम्ही रिझर्व्ह बॅंकेला कळवणार आहोत, असंही सोमय्या यावेळी म्हणाले.

कोण आहेत आनंदराव अडसूळ?
– आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार
– 1996 पासून पाच वेळा खासदारकी
– शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांमध्ये अडसूळांचा समावेश
– गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांकडून पराभवाचा धक्का