किती दुदैव पहा… क्वारंटाईन केल्याने मुलीच्या अंत्यविधीला आई-वडिलांची अनुपस्थिती

0
503

पुणे, दि. २२ (पीसीबी) : मुलीच्या निधनानंतर मुंबईहून पुण्यात आलेल्या आई वडिलांना होम क्वारंटाईन झाल्याने तिचे अंत्यविधीही करता आले नाहीत. मुलीच्या मामानेच तिचे पिंडदान विधी केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील चांडोह येथे घडली. कोरोना दक्षता समितीच्या आक्षेपामुळे गावात असूनही आई वडील अंत्यविधी करु शकले नाहीत.शिरुरमध्ये राहणाऱ्या संबंधित तरुणीचे 13 मे रोजी निधन झाले. आजारी असल्याने तरुणी काही महिन्यांपूर्वी मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत होती. मात्र मुंबईत सुविधा नसल्यामुळे ती मामा राहत असलेल्या चांडोह या गावी आली.

दरम्यानच्या काळात लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे तिला मुंबईला जाता आले नाही. 13 मे रोजी तरुणीने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर तिचे आई-वडील मुंबईहून मेडिकल प्रमाणपत्र, पोलीस पास घेऊन गावी आले. शिरुरच्या तहसीलदारांना माहिती देऊन दाम्पत्य होम क्वारंटाईन झाले होते. परंतु कोरोना दक्षता समितीला हे मान्य नसल्यामुळे त्यांना गावातील मराठी शाळेत राहण्यास सांगितले.

आई वडील गावात असूनही त्यांना मुलीचे दशक्रिया विधी करता आले नाहीत. कोरोनामुळे ना अंत्यविधी, ना दशक्रिया विधीना आई वडील येऊ शकले. शेवटी मामांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ठराविक लोकांमध्येच शेतामध्ये भाचीचं पिंडदान केले. लॉकडाऊनमुळे मुलगा-सून बाहेरगावी अडकल्याने सिंधुदुर्गात वृद्धेवर गावकऱ्याने अंत्यसंस्कार केले होते. विशेष म्हणजे आपल्याच घरातील समजून त्यांनी अस्थी विसर्जन, पिंडदान आणि केशार्पण विधीही केले होते.