कितीही पैसे खर्च करा पण शिवाजी महाराजांचे गड-किल्ले पुन्हा उभे करा- राज ठाकरे

0
469

मुंबई, दि. १५ (पीसीबी) पुण्यातील कसबा पेठ येथील मनसेच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी पुतळे आणि स्मारके बांधण्याच्या सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली. ‘पाच वर्षांमध्ये गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा बांधून झाला पण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काहीच काम झाले नाही,’ अशी टीका राज यांनी केली. तसेच कितीही पैसे खर्च करा पण शिवाजी महाराजांचे गड-किल्ले पुन्हा उभे करा असेही राज आपल्या भाषणामध्ये म्हणाले.

सरकारकडून पुतळे आणि स्मारक बांधण्याच्या नुसत्या घोषणा केल्या जातात असे सांगत राज यांनी सरकारवर निशाणा साधला. ‘सरकार फक्त घोषणा करते. महाष्ट्रात आधीच आणि हे सरकार फक्त घोषणा करत राहिले. गुजरातमध्ये वल्लभभाई पटेलांचा तीन हजार कोटी खर्च करुन पुतळा उभा करुन टाकला. पण आमच्या महाराजांचा पुतळा अजून उभा राहत नाही. त्यांना त्यांच्या माणसांची आठवण होते. त्यांना तो इतिहास जपावा वाटतो,’ असे राज ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना राज यांनी शिवाजी महाराजांचे नाव राज्यामध्ये केवळ निवडणुकांमध्ये वापरले जाते अशी टीका केली. ‘आमचा इतिहास खूप मोठा आहे. ज्यांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो त्या शिवछत्रपतींचा पुतळा हा नुसता निवडणुकीचे नाटक आणि निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये मतदारांना तोंडाला पाने पुसण्यापुरता मर्यादित राहिला आहे,’ असा टोला राज यांनी लगावला. तसेच अगदी काँग्रेसचे सरकार असल्यापासून पुतळे उभारण्याला माझा विरोध होता असे राज यांनी सांगताना पुतळे आणि स्मारकांऐवजी महाराजांनी बांधलेले किल्ले पुन्हा उभे करा असे आवाहन सरकारला केले.

‘मी आधीपासूनच सांगतोय पुतळे उभारु नका, आमच्या शिवाजी महाराजांचे काही स्मारक करायचे असेल तर आमच्या महाराजांचे जे काही गड-किल्ले आहेत ना ते उत्तम रितीने आधीसारखे उभे करा. कितीही खर्च लागला तरी चालेल ते गड-किल्ले पहिल्यासारखे उभे करा. आमच्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही सांगू शकू की आमचा राजा कोण होता. त्या गड-किल्ल्यांवर इतिहास कळला पाहिजे आमचा. अटकेपार झेंडे रोवण्याचा पराक्रम करण्यापर्यंत मराठ्यांचा इतिहास आहे. एवढा मोठा इतिहास आहे आपला पण तो आपण जगाला ओरडून सांगत नाही, आपल्या मुलांना सांगत नाही,’ अशी खंत राज यांनी व्यक्त केली.