का साजरी केली जाते गुरुपौर्णिमा ?

0
1331

पिंपरी, दि, १६ (पीसीबी) (प्रतिनिधी शंकर सदार) – आषाढातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी गुरूंची पूजा करून त्यांना मानवंदना दिली जाते. देशात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पूर्वीच्या काळी विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेते वेळी भावपूर्ण श्रद्धेने गुरुपूजा करून गुरुदक्षिणा देत होते. चारही वेदांवर प्रभुत्व असणा-या व्यास ऋषींची गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा केली जाते.

व्यासांनी लोकांना वेदांचे धडे दिले. त्यामुळेच त्यांना आद्यगुरू मानले जाते. तसेच गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमाही संबोधले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यासांचा अंश मानून गुरूंची पूजा केली जाते. गुरू नेहमीच प्रेरणादायी असतात. गुरू कुंभाराप्रमाणे आपल्याला घडवत असतात. त्यांच्यामुळेच आपल्या जीवनाला खरा आकार प्राप्त होतो.

गुरु ब्रम्हा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वर:, गुरु साक्षात परमब्रम्ह, तस्मै श्री गुरुवे नम: !

गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. विशेषतः गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ गुरूच (शिक्षकच) नव्हे, तर आई-वडील, मोठ्या भाऊ-बहिणींची पूजा करण्याची प्रथा आहे. गुरु ती शक्ती आहे जी ज्ञानाला धारण करण्यात सक्षम असते व स्वत:च्या शक्तीने या ज्ञानाच्या तापाला शिष्याच्या स्तरावर आणू शकते. अर्थात थंडगार दगडावर उकळते जल ओतण्याऐवजी, त्या जलाचे तापमान सर्वप्रथम किंचित कमी करून मग थेंब थेंब करून हे जल त्या दगडावर सोडले जाते, जेणेकरून त्या दगडाला तडा न जाता याउलट त्या दगडाचे तापमान हळूहळू वाढू लागते आणि साधकपण त्या गरम जलाप्रमाणे तापू लागतो आणि स्वत: गुरुपदाला जाऊन पोहोचतो