Chinchwad

कासारसाई प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवा; मानवाधिकार संघटनेची मागणी    

By PCB Author

October 05, 2018

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) – कासारसाई येथील दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा, तसेच आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी मानवाधिकार संघटनेच्या वतीने वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्याकडे केली. 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर हिंजवडी परिसरातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थिंनी भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. महिला , मुलींचे जीवन असुरक्षित झाले आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात मुलींच्या छेडछाडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तरी असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात.

तसेच पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चोऱ्या, दरोडे, खून, बलात्कार, खंडणी, लूटमार, सायबर गु्न्हे, असे गुन्हांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर कार्यवाही सुरू करावी. कासारसाई प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा. त्याचबरोबर आरोपींना फाशीची शिक्षा होण्याबाबत तीन महिन्यात योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय निरीक्षक रामराव नवघन, भारत वाल्हेकर, सुभाष कोठारी, दिलीप टेकाळे, मुनीर शेख, विकास कांबळे, अविनाश रानवडे, ओमकार शेरे, लक्ष्मण दवणे, नितीन चौधरी, विजय मैड, सतीश नगरकर आदी उपस्थित होते.