कासारवाडीमध्ये गावठी पिस्तूल आणि एक जीवंत काडतुसासह सराईताला अटक

1258

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – गावठी पिस्तूल आणि एक जीवंत काडतुसासह निगडी येथे राहाणाऱ्या एका सराईताला कासारवाडी रेल्वे स्टेशन येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.१७) रात्री आठच्या सुमारास करण्यात आली.

भीमजीत नागेश राऊत (वय २८, रा. नॅश्नल गॅरेजजवळ, त्रिवेणीनगर, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भोसरी पोलीस ठाण्यातील टिम क्रमांक २ मधील पोलीस कर्मचारी सुमीत देवकर यांना त्यांच्या खबऱ्याकडून नाशिक फाटा येथील कासारवाडी रेल्वे स्टेशनजवळ एक इसम पिस्तूल घेऊन उभा आहे, अशी माहिती मिळाली होती. यावर टिम क्रमांक २ मधील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. आणि संशयीत भीमजीत याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि एक जीवंत काडतुस असा २० हजार रुपयांचा ऐवज आढळून आला. पोलीसांनी तो जप्त केला आणि भीमजीत याला अटक केली. दरम्यान आरोपी हा सराईत गंड असून त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत.  भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.