कासारवाडीत चोरीच्या शेळ्यांचे मटण आणि गाड्या विकणाऱ्या तिघांना अटक

0
853

भोसरी, दि. १५ (पीसीबी) – चोरीच्या शेळ्यांचे मटण आणि गाड्या विकणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भोसरी पोलिसांनी कासारवाडी चौकात केली असून या तिघांकडून चोरीच्या १० शेळ्या, दोन दुचाकी आणि एक तवेरा कार असा एकुण ६ लाख ३६ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अल्तमश कुरेशी (वय १८), सोमेश तायड (वय १९), रोहन रिठे (वय २०, सर्व रा. खडकी बाजार) असे अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी समीर रासकर यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती कि सराईत आरोपी अल्तमश हा कासारवाडी येथे चोरीची कार विक्री करण्यासाठी येणार आहे. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून अल्तमश आणि त्यांचे साथीदार सोमेश आणि रोहन या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे चोरीच्या १० शेळ्या, दोन दुचाकी आणि एक तवेरा कार असा एकुण ६ लाख ३६ हजारांच्या ऐवज असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तसेच चोरलेल्या शेळ्यांचे मटन ते कासारवाडीतील त्यांच्या मटणाच्या दुकानात विकत असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तो ऐवज जप्त करुन तिघांना अटक केली आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.