Pune

काळ्या बाहुल्यांवर शेतकरी आणि व्यवसायिकांचे फोटो लावून जादूटोणा

By PCB Author

December 05, 2019

लोणावळा, दि.५ (पीसीबी) – लोणावळा ग्रामीण परिसरातील तुंग येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रगतशील शेतकरी आणि व्यवसायिकांच्या नावाने जादूटोणा केल्याची घटना उघडकीस आली आहे. काळ्या बाहुल्यांवर व्यक्तींचे फोटो लावून लिंबू, खिळे, बिबा, टाचणी मारून झाडाला ठोकल्याचे समोर आले आहे.

पांडुरंग कृष्णा जांभुळकर, संदीप एकनाथ पाठोर, संजय धोंडू कोकरे, किसन बंडू ठोंबरे, योगेश श्रीराम घाडगे, संतोष कोंडीबा घारे, अजय कुमार मेहता, कैवशर शेख, मनोज सेनानी अशी या प्रगतशील शेतकरी आणि व्यवसायिकांची नावे आहेत. जादूटोणा करण्यासाठी यांचे फोटो वापरण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा ग्रामीण येथील तुंग परिसरातील इसार हायस्कूलजवळ हा प्रकार घडला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवर काळ्या बाहुलीवर फोटो त्यावर लिंबू आणि बिबा लावून पुन्हा लिंबू लावत टाचण्या, खिळ्याने ते झाडाला ठोकले आहेत. लाल कपड्यात नारळाने भरलेले गाठोडे देखील झाडाला बांधलेले आहे. जादूटोणा, भानामती, करणी करण्यात आल्याचे पोलीस तक्रारीत सांगण्यात आले आहे. संबंधितांची प्रगती सहन होत नसल्यानेच हा प्रकार केला असावा असेही तक्रारीत म्हटले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.