काळेवाडीत शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळाच्या तापकीर शाळेत शिवजन्मोत्सव साजरा

0
892

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – काळेवाडी येथील शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ संचलित तापकीर शाळेच्या वतीने काळेवाडी येथील तापकीर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी (दि. १९) साजरी करण्यात आली.

प्रभाग स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवजन्म ते शिवराज्याभिषेक पर्यंतचा प्रवास गाण्यांच्या माध्यमातून साकारला. प्रितम शेळके, श्रेयश कागदे या विद्यार्थ्याने शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. शुभम पन्हाळे, रितेश चौधरी, अस्मिता अवचार, विनायानी लोहार, पायल कांबळे या विद्यार्थ्यांनी पोवाडे सादर करून स्फूर्तीदायी वातावरण तयार केले. भूषण कुमार धुपे, अथर्व इप्परकर, प्रगती जाधव या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरक इतिहास मांडून उपस्थितांची वाहवा मिळविली. ओंकार जाधव आणि सहकारी यांनी खड्या आवाजात शिवाजी महाराजांची आरती सादर केली.

यावेळी माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, छावा युवा मराठा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, नाना फुगे, तिरोडा विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख युवराज दाखले, प्रभाग स्वीकृत सदस्य देविदास पाटील, सुरेश पाटील, संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर, संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्या अश्विनी तापकीर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर, पुणे केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक विभागाच्या प्रभारी मुख्याध्यापिका जयश्री पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल भटकर यांनी केले. उपशिक्षिका उल्का जगदाळे यांनी आभार मानले. जम्मु काश्मीर पुलवामामध्ये आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.