Chinchwad

काळेवाडीत बांधकाम केलेल्या कामाचे पैसे मागीतले म्हणून ठेकेदाराला जबर मारहाण

By PCB Author

March 20, 2019

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – आरसीसीचे बांधकाम केलेल्या कामाचे पैसे मागीतले म्हणून आठ जणांच्या टोळक्यांनी एका ठेकेदाराला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. १९) सकाळी अकराच्या सुमारास काळेवाडी येथील दर्वेश कन्स्ट्रक्शन येथे घडली.

चंदू इस्त्राफिल मंडल (वय ३९, रा. रहाटणी) असे मारहाणीत जखमी झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माणिक बाळकृष्ण वाघिरे (वय ४६), शरद प्रकाश कोतकर (वय २४), पवन संजय हिरवे (वय २५, सर्व रा. पिंपरीगाव) आणि त्यांच्या चार ते पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे काळेवाडी येथे बांधकाम सुरु आहे. त्या साईटवर फिर्यादी चंदू यांनी आरसीसीचे काम केले होते. त्या कामाची रक्कम १ कोटी ६० लाख रुपये होती. ती रक्कम मागण्यासाठी चंदू मंगळवारी सकाळच्या सुमारास आरोपींना फोन केला होता. यावर आरोपींनी चंदू यांना फोनवर शिवीगाळ केली. तसेच बांधकाम साईटवर जाऊन लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करत गंभीर जखमी केले. यातील आरोपी माणिक वाघिरे हा भाजप नगरसेवकाचा भाऊ आहे. त्याने चंदू याला ‘माझ्या नादी लागलास तर जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.