डॉक्टरांच्या चिठीशिवाय औषध दिल्याचे सांगून काळेवाडीतील औषध विक्रेत्याला फोनवरुन पैशांची मागणी

0
1649

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – डॉक्टरांच्या चिठीशिवाय औषध दिल्याने एक मुलगी आजारी पडली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिचा सर्व खर्च तुम्हाला करावा लागेल आणि नाही केला तर पोलीसांत तक्रार देईन, अशी धमकी देण्यात आली. ही घटना आज (गुरुवार) दुपारी तीनच्या सुमारास तुळजा भवानी कॉलनी, नढेनगर, काळेवाडी येथे घडली.

किरण रमेश निकम (वय ३२, रा. तुळजाभवानी कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) असे धमकावण्यात आलेल्या मेडिकल व्यवसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पुजारी (रा. नवी मुंबई) नावाच्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण निकम यांचा काळेवाडी येथे मेडिकलचा व्यवसाय आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास निकम यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन आरोपी पुजारी नामक इसमाने, मी नवी मुंबई येथून बोलत आहे. तुम्ही एका मुलीला डॉक्टरांच्या चिठीशिवाय औषध दिल्याने ती मुलगी आजारी पडली आहे. आणि तिच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तुम्ही जर तिच्या रुग्णालयाचा खर्च केला नाही. तर मी तुमच्या विरोधात काळेवाडी आणि नवी मुंबई येथील पोलीसात तक्रार दाखल करेन, अशी धमकी दिली. याप्रकरणी पुजारी नावाच्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.