‘काळजीवाहूं’ची काळजी’, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

0
293

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ‘विठ्ठला, नक्की काय चुकलं? ‘काळजीवाहूं’ची काळजी’ या मथळ्याखाली लिहिलेल्या अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा एकदा मावळते मुख्यमंत्री असा उल्लेख करत, काळजीवाहू किती दिवस राहणार? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ‘वर्षा’वरील बड्या पोलीस अधिकाऱ्यांना काळजीवाहूंचे राजकीय कार्यकर्ते म्हणून काम करता येणार नाही आणि त्यांनी तसे केल्यास भविष्याचे भान ठेवावे, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी त्यांच्यावर पुढील व्यवस्था होईपर्यंत कामकाज पाहण्याची जबाबदारी दिली. पण याबाबत शिवसेनेने चिंता व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस काळजीवाहू या बिरुदावलीने वर्षावर थांबतील, पण किती दिवस याचा निर्णय राज्यपालांना घ्यावाच लागेल. त्यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही, प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही राज्यनिष्ठेचे भान ठेवावे, असा सल्ला अग्रलेखातून देण्यात आला आहे.

राज्याची स्थिती अस्थिर आहे, पण ही स्थिती लवकरच स्थिर होईल आणि रयतेचे राज्य येईल. राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलावू शकतात. त्यामुळे भाजपने ही संधी सोडू नये. सर्वात मोठा पक्ष म्हणून ते पुढाकार घेत नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. शिवसेनेशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही, असे भाजपचे नेते राज्यपालांना भेटून आल्यानंतर सांगतात, पण लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन देण्यात आले होते, त्याबद्दल शब्दही काढत नाहीत. या बनवाबनवीचा आम्हाला आणि जनतेला वीट आला आहे, असे भाष्य अग्रलेखातून करण्यात आले आहे.