पिंपरीत कार पार्क करण्याच्या कारणावरुन टोळक्यांची तरूणाला बेदम मारहाण

0
2076

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – कार पार्क करण्याच्या कारणावरुन आठ जणांच्या टोळीने एका तरुणास बेदम मारहाण केली. ही घटना पिंपरीतील मिलिंदनगरमध्ये घडली.

मुकेश धनराज बजाज (वय २८, रा. शनी मंदिराजवळ, पिंपरी)  असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल पवार ऊर्फ चंड्या (वय २६), हर्षे (बाबा), चुगानी (वय ३२), बॉक्सर (पूर्ण नाव माहिती नाही), प्रतीक पालवे, अमोल श्रीवास्तव, राहुल टोणपे, अनिल ऊर्फ चिमिच रोअरा या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकेश बजाज यांनी त्यांच्या घरासमोरील मोकळया जागेत त्याची कार पार्क केली होती. ती कार तेथून काढावी, यासाठी आरोपी अतुल पवार याने बजाज याला मारहाण केली. चुगानी आणि प्रतिकने लोखंडी रॉडने मारहाण केली. बॉक्सरने डोक्यात वीट मारली. यावेळी झालेल्या झटापटीत बजाज याची सोनसाखळी गहाळ झाली. त्यानंतर प्रतीक पालवे यानेही लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी आठही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.