कार्यक्रम पत्रिकेत विनायक मेटेंचे नाव नसल्याने शिवसंग्रामच्या गुंड कार्यकर्त्याची चक्क डॉक्टरला मारहाण

0
841

बीड, दि. २२ (पीसीबी) – शिवसंग्रामचे अध्यक्ष व माजी आमदार विनायक मेटे यांचे कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव न टाकल्याने त्यांच्या पक्षांच्या गुंड कार्यकर्त्यांनी एका डॉक्टरला बेदम मारहाण केली आहे. मारहाणीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर शिवसंग्रामचे गुंड कार्यकर्ते फरार झाले आहेत.

बीडमधील डॉ. सोमनाथ पाखरे यांच्या हॉस्पिटलचे उद्घाटन होते. या उद्घाटनासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे आणि आमदार जयदत्त क्षीरसागर येणार होते. त्यानुसार डॉ. पाखरे यांनी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापूल त्यांचे वाटप केले. परंतु, शिवसंग्रामचे कार्यकर्ते राहुल आघाव यांनी हॉस्पिटल उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत विनायक मेटे यांचे नाव का टाकले नाही म्हणून डॉ. पाखरे यांना बेदम मारहाण केली.

राहुल आघावने डॉ. पाखरे यांना केलेल्या मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आघाव हा तब्बल दहा मिनिटे डॉ. पाखरे यांना मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. तो दारुच्या नशेत होता, अशी माहिती डॉ. पाखरे यांनी दिली आहे. याप्रकरणी डॉ. पाखरे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आघावच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आघाव हा फरार झाला आहे. शिवसंग्रामच्या या गुंडगिरीचा बीडमधील डॉक्टर संघटना आणि सर्वसामान्य जनतेकडून निषेध होत आहे.