Pune

“कार्यकर्त्यांनी समाजकारणावर भर द्यावा”- आ. चंद्रकांतदादा पाटील

By PCB Author

September 23, 2021

– प्रा.ना.स.फरांदे स्मृती प्रतिष्ठान ची स्थापना

पुणे, दि. २३ (पीसीबी) – सामान्य कार्यकर्ता ते 1991 साली भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, तीन वेळा विधानपरिषदेचे निर्वाचित सदस्य तसेच विधानपरिषद उपसभापती व सभापती अश्या विविध जबाबदाऱ्या पार पाडलेले कै. ना. स. फरांदे यांचे कार्य भावी पिढी पुढे आदर्शवत असेच आहे, त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि स्नेहीजनांनी सार्वजनिक विश्वस्त संस्था स्थापन केली याचा आनंद वाटतो असे भाजप चे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

प्रा. ना. स.फरांदे स्मृती प्रतिष्ठान च्या बोधचिन्हाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष अभिजित फरांदे, कार्याध्यक्ष व भाजप महिला मोर्चाच्या कोथरूड मंडल अध्यक्ष सौ. हर्षदा फरांदे, ट्रस्ट चे सचिव व भाजप चे प्रवक्ते संदीप खर्डेकर, विश्वस्त स्वप्नील लडकत, विश्वस्त व भाजप महिला मोर्चा च्या आय टी सेल च्या संयोजिका सौ.कल्याणी खर्डेकर, विश्वस्त सौ. प्रेरणा लडकत रासकर इ. उपस्थित होते. भाजप कार्यकर्त्यांनी राजकारणासोबतच समाजकारणावर भर द्यावा, नागरिकांना निस्पृह वृत्तीने त्यांच्या साठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याबद्दल प्रेम,कौतुक आणि आदर असतोच असा सल्ला ही आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला व ट्रस्ट च्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देताना सर्वतोपरी मदत करण्याचे वचन ही दिले. या ट्रस्टच्या माध्यमातून विविध समजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे ट्रस्टच्या कार्याध्यक्ष सौ. हर्षदा फरांदे यांनी सांगितले, तसेच माझे श्वसूर नारायणराव फरांदे यांच्या स्मृती जतन करण्यासोबतच त्यांचे संघर्षपूर्ण व प्रेरणादायी कार्य सामान्य कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरावे यासाठी ह्या ट्रस्ट च्या माध्यमातून कार्य करणार असल्याचा संकल्प ही सौ. फरांदे यांनी जाहीर केला.

प्रा. ना. स. फरांदे यांच्या त्यागमय जीवनाने प्रेरित होऊन त्यांच्या पत्नी श्रीमती मंगलाताई फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा ट्रस्ट स्थापन केला असून त्याही या प्रतिष्ठान च्या विश्वस्त असल्याचे संस्थेचे सचिव संदीप खर्डेकर म्हणाले.सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित घटकांसाठी कार्य करण्याचा मनोदय ही श्री. खर्डेकर यांनी व्यक्त केला. लवकरच प्रतिष्ठान च्या वतीने एका औपचारिक कार्यक्रमात वाटचालीस सुरुवात करणार असल्याचे अध्यक्ष अभिजित फरांदे यांनी स्पष्ट केले.