Maharashtra

कार्यकर्त्यांनी आपल्या जमिनी विकून पक्ष वाढवावा; मंत्री महादेव जानकरांचा अजब सल्ला

By PCB Author

January 03, 2019

सांगली, दि. ३ (पीसीबी) –  कार्यकर्त्यांनी  राज्यात पक्ष वाढवण्यासाठी प्रसंगी स्वतःच्या जमिनी विकून राष्ट्रीय समाज पक्षाच्या नावाने कार्यालये स्थापन करावीत,  असा अजब सल्ला रासपचे अध्यक्ष आणि पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी आज (गुरूवार) येथे दिला. 

सांगलीत रासप पक्षाच्या जिल्हा आढावा बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महादेव जानकर बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, आपला पक्ष शून्य आहे. कार्यकर्त्यांनी नाटके बंद करावीत, दोन दिवसात श्रीमंत व्हायची आमच्या पक्षात कुठलीही योजना नाही. म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या जमिनी विकून पक्ष वाढवावा. असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. तसेच कार्यकर्त्यांनी आपली औकात आपल्या चौकात तरी दाखवावी, असा टोला देखील  जानकरांनी कार्यकर्त्यांना लगावला.

दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना जानकरांनी २००४  मध्ये केली असून रासप महाराष्ट्रासह आसाम, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतो.  मात्र, राज्यात या पक्षाचा म्हणावा तितका विस्तार झालेला नाही. भाजपने त्यांना विधान परिषदेवर घेऊन पशूसंवर्धन आणि दुग्धविकास या खात्याची जबाबदारी  दिली आहे.