कार्ती चिदंबरम् यांच्या घरांवर सीबीआयचे छापे

0
165

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. बेकायदेशीर व्यवहार आणि बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) आज सकाळी ६ वाजता पी. चिदंबरम यांच्या ११ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१०-१४ दरम्यान झालेल्या कथित विदेशी व्यवहारासंदर्भात तपास संस्थेने कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात नवीन गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार छापे टाकण्यात आले आहेत. कार्ती चिदंबरम यांची अनेक प्रकरणांमध्ये चौकशी केली जात आहे, ज्यात INX मीडियाने विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या (FIPB) मंजुरीने परदेशातून ३०५ कोटी रुपये मिळवल्याच्या प्रकरणाचा समावेश आहे. त्यावेळी त्यांचे वडील पी चिदंबरम देशाचे अर्थमंत्री होते. कार्ती चिदंबरम यांनी या छाप्यांवर प्रतिक्रिया दिली असून “आता मी मोजणी थांबवली आहे. हे किती वेळा घडले? याचीही नोंद व्हायला हवी.” असे त्यांनी ट्विट केले आहे.

२५० चिनी लोकांना व्हिसा दिल्याचा आरोप
कार्ती चिदंबरम यांनी चुकीच्या पद्धतीने पैसे घेऊन २५० चिनी लोकांना व्हिसा दिल्याचा आरोप आहे. हे प्रकरण पंजाबमधील एका वीज प्रकल्पाशी संबंधित आहे, ज्यामध्ये व्हिसा जारी करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने नवा गुन्हा दाखल केला आहे. चेन्नई, मुंबई, तामिळनाडू, पंजाब, ओडिशा एकूण ११ ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.