कार्तिकी एकादशीचा आज सोहळा; अलंकापुरीत वैष्णवांचा मेळा

0
563

आळंदी, दि. ३ (पीसीबी) – कार्तिकी वारीचा अनुपम सोहळा ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्यासाठी लाखो वैष्णवांचा मेळा अलंकापुरीत दाखल झाला आहे.  आज (सोमवार) कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा करण्यात आला. पहाटे पवमान अभिषेक, दुधारती, वेदमंत्र जयघोष, करण्यात आला. त्यानंतर महानैवेद्य, पालखीची नगर प्रदक्षिणा, धुपारती, जागर आदी कार्यक्रम होणार आहेत.

आळंदीत कार्तिक वद्य अष्टमीपासून माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला आहे. त्यासाठी आळंदीत लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल झाले आहेत. शहरातील प्रदक्षिणा रस्त्याबरोबरच पालिका चौक, चाकण रस्ता, गोपाळपुरा, वडगाव रस्ता, पद्मावती रस्ता, देहू आळंदी रस्ता, नवीन पुलाकडील रस्ता वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला आहे. दरम्यान, यंदा राज्यात दुष्काळ पडल्याने दरवर्षीपेक्षा यंदा वारकऱ्यांची संख्या  रोडावली आहे.

महाद्वार तसेच इंद्रायणी तीरावर  भाविकांनी स्नान करण्यासाठी मोठी गर्दी गेली होती. पहाटेपासून वारकऱ्यांचा ओघ सुरू होता. ठिकठिकाणी माउली-माउलीचा गजर आणि टाळमृदंगाचा नाद ऐकू येत होता. माउलींच्या समाधीसाठीची दर्शनबारीची रांग पूर्ण भरून इंद्रायणीतीरी प्रशस्त दर्शनमंडपात गेली होती.  देऊळवाड्याच्या पश्चिम दरवाजातील दर्शनमंडपातून आत प्रवेश करताना  भाविकांना देवस्थानच्या वतीने खिचडी वाटप केले जात होते. माउली-माउली नामाचा अखंड गजर देऊळवाडा आणि परिसरात होता. राज्यभरातून  दिंड्यां दाखल झाल्या आहेत. राहुट्या आणि मंडपातून भजन कीर्तन सुरू होते.  दरम्यान पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.