कार्तिकने हिरावला पंजाबचा विजय

0
518

दुबई, दि.२२ (पीसीबी) : कार्तिक त्यागीने टाकलेल्या अखेरच्या अफलातून षटकाने पंजाब किंग्ज संघाचा विजय हिरावून घेतला. राजस्थान रॉयल्स संघाने दोन धावांनी हा सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाला यशस्विनी जैस्वाल आणि महिपाल लोमरोर यांच्या फटकेबाजीने १८५ धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबच्या अर्षदीप सिंग याने पाच गडी बाद करून जबरदस्त कामगिरी केली. पण, त्यागीच्या अखेरच्या षटकाने त्याच्या प्रयत्नांवर पाणी फिरवले. पंजाब संघाने जवळपास सामना जिंकला होता. केवळ शिक्कामोर्तब होण्याचे बाकी होतो. पण, ती मोहोर उमटलीच नाही. त्यांचा डाव ४ बाद १८३ असा मर्यादित राहिला.

आव्हानाचा पाठलाग करताना आंतरराष्ट्रीय स्तरावर जम बसवलेल्या लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांनी पंजाबला अपेक्षित सुरवात करून दिली होती. त्यांच्या फलंदाजीसमोर रॉयल्सचे गोलंदाज साफ निराश झाले होते. या जोडीने १२० धावांची भागीदारी केली होती. पण, १२व्या षटकाती पाचव्या चेंडूवर सकारियाने राहुलची विकेट मिळवली. राहुलने या खेळीत आयपीएलमधील ३ हजार धावांचा टप्पाही ओलांडला. पुढच्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर टिवाटियाने अगरवालला बाद केले. त्यानंतरही एडन मार्करम आणि निकोलस पुरन यांनी विजयाच्या मार्गावर चालायला सुरवात केली होती. त्यांची देखिल नजर बसली होती. सगळे पंजाबच्या बाजूने चालले होते. यानंतरही त्यांना धावांचा वेग राखण्यासाठी झगडावे लागले होते.

पंजाबला अखेरच्या दोन षटकांत ८ धावांची आवश्यकता असताना हीच दोन षटके सामन्याला कलाटणी देणारी ठरली. यातील १८वे षटक सनसनाटी म्हणण्यापेक्षा वादग्रस्त ठरले. गोलंदाज मुस्तफीझुर रेहमान याने सलग दोन चेंडू क्रीजची साईडची लाईन कट करून टाकले होते. नियमानुसार हे दोन्ही चेंडू नो-बॉल ठरणे अपेक्षित होते. पण, पंचांनी याबाबत कुठलाच निर्णय घेतला नाही आणि शेवटचे त्यागीचे षटक सर्वात नाट्यपूर्ण ठरले. सहा चेंडूत चार धावांचे आव्हान मार्करम आणि पुरन यांना पेलता आले नाही. बदलत्या गोलंदाजी पद्धतीचा उपयोग करताना त्यागीने चेंडू उजव्या यष्टिबाहेर काहीसा लांबच ठेवला. यात प्रथम पुरन आणि नंतर दीपक हुडा अडकला. शतकी सलामीनंतरही अखेरच्या षटकांत पंजाबला चार धावांची मजल मारता आली नाही.

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर एविन लुईस आणि यशस्विनी जैयस्वाल यांनी आक्रमक सुरवात केली होती. मात्र, फटकेबाजीच्या नादात लुईसला थांबण्याचे कळाले नाही. संजू सॅमसनला घाई महागात पडली. त्या वेळी जैस्वालने संयम दाखवत खेळपट्टीवर थांबणे पसंत केले. पण, तो ही बाद झाल्यावर महिपाल लोमरोर याने १७ चेंडूंत ४३ धावांचा तडाखा देताना राजस्थानचे आव्हान भक्कम करण्यात आपला वाटा उचलला होता.

संक्षिप्त धावफलक –
राजस्थान रॉयल्स – २० षटकांत सर्व बाद १८५ (यशस्विनी जैस्वाल ४९ (३६ चेंडू, ६ चौकार, २ षटकांर), महिपाल लोमरोर ४३ (१७ चेंडू, २ चौकार, ४ षटकरा), एविन लुईस ३६, अर्षदिप सिंग ५/३२, मोहंमद शमी ३/२१) वि. वि. पंजाब किंग्ज २० षटकांत ४ बाद १८३ (लोकेश राहुल ४९, मयांक अगरवाल ६७ (४३ चेंडू, ७ चौकार, २ षटकार), निकोलस पूरन ३२, एडन मार्करम नाबद २६, कार्तिक त्यागी २-२९)