Pune Gramin

कारमधून 12 लाखांची रोकड पळवणा-या चालकासह चौघांना अटक

By PCB Author

August 11, 2021

तळेगाव दाभाडे, दि. ११ (पीसीबी) – कार मधून 12 लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असलेल्या एका कार चालकाला तीन अनोळखी व्यक्तींनी अडवले. कार चालकाला बोलण्यात गुंतवून एका व्यक्तीने त्यांच्या कारमधून 12 लाख रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तळेगाव चौक, चाकण येथे घडली. या प्रकरणातील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

समीर ज्ञानेश्वर सोनवणे (वय 21), अक्षय पुंजा सोनवणे (27), प्रदीप सुनील नवाळे (वय 22), सुरेश दादू गायकवाड (वय 32, सर्व रा. संगमनेर अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

राजू रावसाहेब बो-हाडे (वय 37, रा. करुले, ता. संगमनेर, अहमदनगर) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार,संगमनेर येथील के के थोरात या कंपनीचे लेखापाल फिर्यादी बो-हाडे आणि कार चालक सुरेश गायकवाड त्यांच्या कार मधून (एम एच 17 / बी एक्स 7576) बारा लाख रुपये रोख रक्कम कंपनीतील कामगारांचे पगार करण्यासाठी घेऊन जात होते. तळेगाव चौक चाकण येथे अनोळखी 3 इसमांनी फिर्यादी यांची गाडी आडवली. त्यानंतर कट का मारला असे म्हणून फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवले.

फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवून एका इसमाने फिर्यादी यांच्या गाडीच्या उघड्या दरवाजातून पाठीमागे ठेवलेली बारा लाख रुपये रोकड असलेली बॅग चोरून नेली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरु केली. त्याच वेळी कार चालक सुरेश गायकवाड याच्या हालचालीवर देखील पोलिसांनी बारीक लक्ष ठेवले.

सुरेश गायकवाड याने त्याच्या तीन साथीदारांसोबत हा गुन्हा केल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी चार जणांना अटक करत त्यांच्याकडून 11 लाख रुपये रोख रक्कम आणि एक दुचाकी जप्त केली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवरे, सहाय्यक निरीक्षक विक्रम गायकवाड, उपनिरीक्षक विजय जगदाळे, पोलीस अंमलदार सुरेश हिंगे, संदीप सोनवणे, झनकर, हनुमंत कांबळे, मनोज साबळे, नितीन गुंजाळ, निखिल वर्पे, अशोक दिवटे, प्रदीप राळे, विलास कांदे यांच्या पथकाने केली आहे.