कारण…ते स्वतःच कुटुंब सोडून कसलीच जबाबदारी घेत नाहीत!!

0
242

मुंबई,दि.०९(पीसीबी) – करोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी, तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी दिली. यावरून भाजपा नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी योग्य नाव दिले आहे. कारण..ते स्वतःच कुटुंब सोडून कसलीच जबाबदारी घेत नाहीत!!, लगे रहो !!!” असं म्हणत राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

दरम्यान या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक राज्यातील २ कोटी २५ लाख कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन ताप आणि प्राणवायू (ऑक्सिजन) तपासणार आहेत. तसेच लोकांना आरोग्य शिक्षण आणि महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे, संशयित करोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड विकार, लठ्ठपणा यांसारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा या बाबींचा समावेश आहे.