Desh

कारगील युध्दाची माहिती आधीच लालकृष्ण अडवाणींना होती; गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट

By PCB Author

December 09, 2018

चंदीगड, दि. ९ (पीसीबी) – कारगिल युद्ध होणार असल्याची गोपनीय माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे आधीच होती, असा गौप्यस्फोट ‘रॉ’ या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी केला आहे. गुप्तचर विभागाच्या अपयशामुळेच कारगिल युद्ध झाल्याचे आतापर्यंत सांगितले जात होते, आता रॉच्या माजी प्रमुखांनीच त्यावर भाष्य केले आहे, त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

१९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धाच्यावेळी दुलत हे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये होते. शनिवारी चंदीगडमध्ये सैन्य साहित्य महोत्सवाला संबोधित करताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. कारगिल युद्धापूर्वी काही संदिग्ध हालचालींची आम्हाला माहिती मिळाली होती. त्यावर भाष्य करत आम्ही ही माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवली होती. युद्धापूर्वीच आम्ही अडवाणींना ही माहिती दिली होती, असे ते म्हणाले.

यावेळी निवृत्त लेफ्टनंट जनरल कमल डावर, रॉचे माजी प्रमुख के. सी. वर्मा आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल संजीव लंगर उपस्थित होते. या तिघांनीही दुलत यांच्या मताशी सहमती दर्शवली. तसेच  गुप्त माहिती जास्त काळ ठेवून चालत नाही. त्यावर त्वरित योग्य कार्यवाही होणे आवश्यक आहे, असे स्पष्ट केले.