“कारखानदारांनो साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल”

0
425

सातारा, दि.२५ (पीसीबी) : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे आज सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये आहेत. त्यांच्या हस्ते कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड योद्ध्यांचा सत्कार झाला. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी कोरोना काळातील आरोग्य सुविधांवरुन शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राबाबत मोठं भाष्य केलं. नितीन गडकरी म्हणाले, “आरोग्य किंवा शिक्षण क्षेत्राबाबत केवळ सरकारवर भर न टाकता, समाजातील अन्य घटकांनी समाजासाठी एकत्र आलं पाहिजे. आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्राचा लाभ सर्वांना मिळावा, यासाठी सरकारशिवाय, सामाजिक संस्था, खासगी कंपन्या, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा”

कोव्हिडं काळाची आठवण काढली तरी डोळ्यात पाणी येतं. शिक्षण आणि आरोग्य आरोग्य क्षेत्रांती सरकारसंह समाजातील घटकांचं योगदान आवश्यक आहे. देशात आता तातडीने 600 मेडिकल कॉलेज आणि अन्य सुविधा गरजेच्या आहेत. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या खाजगी संस्थांना मदत करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

कोरोना काळात परमेश्वराने आपली परीक्षा बघितली. कोव्हिड सुरू झाला तेव्हा फक्त 13 हजार व्हेंटिलेटर होते. औषधांचा तुटवडा होता, अशा कठीण परिस्थितीत अनेकांनी आपला जीव धोक्यात घालून मदत केली. शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेच्या सुविधा सरकारने उभ्या केल्या पाहिजेत ही आपली अपेक्षा असते. पण सध्याचा काळ बघता केवळ सरकार नव्हे तर समाजातील विविध घटकांनी या क्षेत्रासाठी पुढे यावं. जसं मी रस्ते प्रकल्पांमध्ये पब्लिक-प्रायव्हेट तत्वावर कामं केली, तसंच या क्षेत्रातही होणं आवश्यक आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.

मला आठवतंय वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मेडिकल आणि इंजिनियरिंग कॉलेज उभे केले. लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने उभे राहिलेल्या या संस्थांचं योगदान मोठं आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली तरी शाळेंची अवस्था बिकट आहे. विद्यार्थी आहेत तर शिक्षक नाहीत, शिक्षक आहेत तर इमारत नाही, तशीच अवस्था रुग्णालयांची आहे. रुग्णालये आहेत तर डॉक्टर नाही, डॉक्टर आहेत तर इमारत नाही. आणि इमारत असली तरी तिकडं कोण जायला मागत नाहीत. तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण भागात, आर्थिक शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कामाची गरज आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.

विदर्भात मी एकटाच तीन साखर कारखाने चालवतो. कारखाना चालवून आता मी थकलो. महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना विनंती आहे साखर उत्पादन कमी करा, इथेनॉल निर्मितीवर भर द्या. जे परावनगी मागतील त्यांना परवानग्या मी मिळवून देतो, असं आश्वासन त्यांनी दिलं.

सरकारला आउट ऑफ बॉक्स कल्पना सांगताना आणि अंमलात आणताना खूप त्रास होतो. सत्ताकारण हेच राजकारण हे मला पटत नाही. पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांनो साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल, मी इथेनॉल निर्मिती संकल्पना आणली नसती तर सगळे खड्यात गेले असते. येणाऱ्या काळात आत्मनिर्भर भारत आपल्याला बनवायचा आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात आजूनही खूप कामाची गरज आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.