Banner News

‘काय बोलताय काय, पिंपरी चिंचवडचा महापौर शिवसेनेचा ?’ – थर्ड आय – अविनाश चिलेकर 

By PCB Author

July 09, 2021

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी शुक्रवारी (९ जुलै) पिंपरी चिंचवड शहर भेटीत मोठे विधान केले. म्हणाले, पिंपरी चिंचवडचा आगामी महापौर शिवेसनेचाच होणार. फक्त ५०-५५ नगरसेवकांत महापौर कसा होणार, या पत्रकारांच्या प्रश्नावर हजरजबाबी संजय राऊत यांनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते. ५५ आमदारांत मुख्यमंत्री होतो ना, मग इथे महापौर का नाही, हे विधान शहराच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट करणारे आहे. राऊत यांच्या विधानामागे बरेच काही गूढ दडलेले आहे. महापालिकेतील १२८ नगरसेवकांच्या संख्या बळाचा विचार केला तर, इथे सत्तेसाठी किमान ६५ च्या पुढे नगरसेवकांची संख्या आवश्यक आहे. लोकशाहित संख्या महत्वाची असते. तत्व, न्याय, निती, आचार, विचार किंवा निष्ठा हे पुस्तकी झाले. प्रत्यक्षात वास्तव वेगळेच असते. राजकारण स्टेजवरचे आणि जमिनीवरचे यात तुफान फरक असतो. महाराष्ट्रात शिवेसना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येतील असे कधी वाटले होते का ?, पिंपरी चिंचवडच्या राजकारणात जिथे अजित पवार यांची मजबूत पकड होती तिथे अवघ्या २-३ नगरसेवकांचा भाजपा, ७८ जागा जिंकून थेट सत्तेत येईल असे स्वप्नात तरी वाटले होते का ? पण ते झाले. राजकारणात काय होईल याचा नेम नाही. अजित पवार आज काकांबरोबर तर उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर असले तरी वाईट वाटू नये. राजकीय घडामोडीत अगदी काहिही घडू शकते. राज्यात भाजपाच्या १०५ जागांचे संख्याबळ असताना त्यावेळीसुध्दा संजय राऊत यांनी शिवेसनेचाच मुख्यमंत्री होणार असे अगदी छातीठोकपणे सांगितले होते. एका पहाटे अजित पवार भाजपाला जाऊन मिळाले आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यावेळीसुध्दा न डगमगता संजय राऊत सतत तेच सांगत राहिले. तेव्हासुध्दा माध्यमांना आणि रथीमहारथींना हाच प्रश्न पडला होता, की हे कसे शक्य आहे. अखेर मुख्यमंत्री शिवसेनेचाच झाला. त्यामुळेच खासदार संजय राऊत यांच्या विधानात दम आहे. आज पिंपरी चिंचवडमध्ये जे बोलले त्याप्रमाणे इथे शिवेसनेचा महापौर झालाच तर आश्चर्य वाटायला नको.

‘शिवेसनेची ताकद ती किती ?’ – महापौर होण्याइतपत शिवसेनेची ताकद, संख्या, क्षमता आहे का, हा खरा प्रश्न आहे. गेल्या ४० वर्षांत मुंबई, ठाणे महापालिकेत आणि नंतर नाशिक, औरंगाबाद महापालिकेत अनेकदा उलथापालाथ झाली मात्र शिवेसनेचा महापौर कायम राहिला. पिंपरी चिंचवड संदर्भात त्याच पद्धतीने शिवेसनेचे स्वतःचे असे काहीतरी अंदाज अडाखे असू शकतात. शहरात शरद पवार, अजित पवार यांच्याशिवाय कोणाचा आवाज नसल्याने राष्ट्रवादीची सलग २० वर्षे सत्ता होती. भाजपाने अगदी पध्दतशीर जमाव जमव केली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवेसनेतूनही फुटीर मंडळींना आपल्या तंबूत घेतले. त्यावेळी देशभर मोदींचीच हवा होती. राष्ट्रवादी काँग्रेस हीसुध्दा काँग्रेस सारखे बुडते जहाज होते की काय एतकी मंडळी भेदरली होती. जहाज बुडते म्हटल्यावर जीव वाचविण्यासाठी अनेक उंदरांनी उड्या टाकल्या. त्यात भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांत राष्ट्रवादी बदनाम झाली. त्या तापल्या तव्यावर भाजपाच्या नेत्यांनी पोळी भाजून घेतली आणि अशक्य ते शक्य केले, सत्ता आली. शहरात शिवसेनेचे दोन खासदार, एक आमदार असूनही शिवेसेना ९ च्या पुढे नगरसेवक निवडूण आणू शकली नाही. आता तर शिवसेनेचा एकच खासदार असताना ५०-५५ नगरसेवक कसे आणि कुठून जिंकणार हे कोडे आहे. १९८६ नंतर ९२ मध्ये ६० नगरसेवकांच्या महापालिकेत गजानन बाबर हे एकमेव शिवेसनेचे नगरसेवक होते. पुढे १९९७ मध्ये १४ संख्याबळ होते, त्या पुढे कधीही आकडा गेला नाही. आता संय राऊत सांगतात आम्ही ५५ चा आकडा लावणार. मूळच्या शिवसेनेतील जुने लढाऊ सैनिक १० टक्केसुध्दा राहिले नाहीत. लोकसभेला सलग तीन वेळा खासदार आणि तब्बल साडेतीन लाखाच्या फराकने जिंकणारे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अडिच लाखांनी हार खातात. पिंपरीचे शिवेसनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा दारून पराभव झाला. पूर्वी गल्लीबोळात शिवेसनेच्या शाखा होत्या, मोर्चा, आंदोलने, निदर्शने म्हटले की शिवेसना हे एकमेव नाव शहरात होते. गाववाला बाहेरचा म्हणजेच भाडेकरू आणि मालक या वादातून शिवसेनेची पाळेमुळे शहरात भक्कम होती. आता शहरातील १०० टक्के शिवेसनेची गावसेना झाली. रिक्षा, टेंपो, पथारी, टपरी चालकांना फक्त शिवेसना वाली होती, आता शिवेसेना ते सगळे विसरली. शिवसेनेचे जनाधार एकदम विरळ झाला आहे. भाजपासारखी शिवेसनेत बाहेरच्या कार्यकर्त्यांची मोठी आवक होईल असेही काही चित्र नाही. महापालिकेत भाजपाच्या कोट्यवधी रुपयेंच्या भ्रष्टाचारावर शिवेसनेने रान पेटवले असेही साडेचार वर्षांत दिसले नाही. एकमेवर आक्रमक नगरसेवक राहुल कलाटे भाजपाचे वस्त्रहरण करत होते, तर त्यांचाच पत्ता कापला. स्मार्ट सिटीत शिवेसनेचा नगरसेवक सदस्य असूनही तो भाजपाचा मांडलिक बनून राहिला. आता शेवटच्या सहा महिन्यांत निवडणुका आल्या म्हणून स्मार्ट सिटी बद्दल १००-२०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा साक्षात्कार झाला. माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी वाजवलेले हे प्रकऱण आता लोकांपुढे कधी पोहचणार आणि त्यातून शिवसेनेला मते कधी मिळणार हासुध्दा प्रश्नच आहे. अशाही परिस्थिती राऊत म्हणतात शिवेसनेचा महापौर होणार म्हणजे काहीतरी गूढ हालचाली सुरू आहेत. शिवेसनेला यापूर्वी १२८ पैकी अर्ध्या जागांवरसुध्दा उमेदवार मिळत नसल्याचे पाहिले. अशा परिस्थितीत उद्या ५०-५५ जागा कशा जिंकणार याचे उत्तर राऊत सोडून कोणालाच माहित नाही. एक मात्र, नक्की सत्तेतून सत्ता हे एक सूत्र असते. भाजपाची दिल्ली, मुंबईची सत्ता होती म्हणून इथे महापालिकेतही सत्ता आली. आता दिल्लीत मोदींची सत्ता कायम आहे, पण राज्यात महाआघाडी आहे. केंद्रात नारायण राणे मंत्री झाले याचा अर्थ पन्हा शिवेसना- भाजपा युतीची सत्ता राज्यात येणार, ही चर्चा निष्फळ ठरली. सगळे कसे धूरकट, संदिग्ध आहे. त्यात राऊत ठापमपणे पिंपरी चिंचवडचा महापौर शिवसेनेचाच, असे विधान करतात. भाजपाचा बेडूक फुगला आणि त्याचा बैल झाला, शिवसेनेचा बेडूक अजून बेडूकच आहे. अशाही अवस्थेत सत्ता येणार म्हणजे चमत्कार होणार, असेच म्हणावे लागेल.

‘महाआघाडी विरुध्द भाजपा, कशी असेल लढत’ – पिंपरी चिंचवड शहरात महाआघाडी म्हणून भाजपा विरोधात राष्ट्रवादी, शिवेसेना, काँग्रेस एकत्र येतील का, आले तर जिंकतील का वगैरे अनेक प्रश्न आहेत. राऊत अत्यंत सावधपणे म्हणतात, महाआघाडीतच लढणार आहोत. अपेक्षेनुसार जागा वाटप झाले पाहिजे असेही त्यांचे मत आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसनेच्या मतांची टक्केवारी यात दोन टोकांचे अंतर आहे. राष्ट्रवादी ४०-४५ टक्के मते घेते तर शिवसेना कधीही २३ टक्केच्या पुढे गेली नाही. भाजपाची स्त्युनामी आली तरी त्या अत्यंत बिकट परिस्थितीतसुध्दा राष्ट्रवादीचे ३६ नगरसेवक जिंकले. १२८ जागांवर आज राष्ट्रवादीकडे किमान ५० जागांवर असे उमेदवार आहेत की जे सहज बाजी मारतील. तेच चित्र शिवेसनेचे पाहिले तर १० जागासुध्दा अशा सांगता येत नाहीत. एकेकाळी शहरात काँग्रेसची मिरासदारी होती. गेल्या २०१७ च्या निवडणुकीत महापालिकेत साधे खातेसुध्दा उघडता आलेले नाही. काँग्रेसची जुनी खोंडं सोडली तर एकही नवा चेहरा नाही. अशा परिस्थितीत महाआघाडीचे जागा वाटप झालेच तर राष्ट्रवादी किमान ७० टक्के जागा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. शिवेसनेला किमान २०-२५ टक्के आणि उरलेसुरले काँग्रेसच्या खात्यात, असे वाटप होऊ शकते. महाआघाडी खरोखरच जागा वाटपात यशस्वी झालीच तर अर्धी नाही पूर्ण लढाई जिंकली असे म्हटले तर वावगे ठरू नये. खरी मेख तिथेच आहे. जागावाटपावर महाआघाडी फिसकटली तर पुन्हा भाजपाचा पत्ता लागू शकतो. राष्ट्रवादीचे ३६ चे ५० आणि शिवेसनेचे ९ चे १९-२० झाले तरी सत्ता येते, पण त्यासाठी एकोपा हवा. राष्ट्रवादीचे किमान ३० नगरसेवक हे भाजपाच्या आजच्या सत्तेचे विविध ठेकेदारीतून लाभार्थी आहेत. राष्ट्रवादीची सत्ता जाऊनसुध्दा त्यांची दुकानदारी बंद नाही. हे घरचे भेदी महाआघाडीचा घात करतील, अशीही शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक प्रवाह शरद पवार समर्थकांचा आणि दुसरा अजितदादा पवार यांच्या समर्थकांचा अशीही दुफळी आहे. दोन वर्षांपूर्वीच्या पहाटेच्या शपथविधी पसून स्वतः अजित पवार यांच्याबद्दल त्यांच्या समर्थकांनाही शाश्वती वाटत नाही. भाजपाने ज्या खेळी करून सत्ता हस्तगत केली त्याच वाटेने राष्ट्रवादी आणि शिवेसना गेली तर कदाचित सत्तेचे स्वप्न सत्यात येईल. भाजपाच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले तर आणि तरच भाजपाचे दोन्ही ताकदवार आमदार नरमतील. केंद्राच्या अखत्यारीतील ईडी, सीबीआय मागे लावून राज्यातील सत्तेसाठी भाजपा खेळ करते, तसाच खेळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुध्दा करू शकतात. मनात आणले तर सगळे शक्य आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक हे शिवेसनेला सोडून द्याचे तर पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर सारख्या महापालिका राष्ट्रवादीसाठी तसेच नांदेड, नागपूर काँग्रेसकडे झुकते माप देऊन जागावाटप करायचे, असेही घाटते आहे. भाजपा विरोधात सगळी ताकद एकवटली तर आणि तरच हे शक्य आहे. महाआघाडीत महापौर पद वर्षभर शिवसेनेकडे आणि दुसरे वर्षे राष्ट्रवादीकडे असे आलटून पालटून झाले तर कुठे पिंपरी चिंचवडमध्ये शिवेसनेचा महापौर शक्य आहे. अन्यथा संजय राऊत यांची भविष्यवाणी फोलसुध्दा ठरू शकते. अजित पवार आणि येणारा काळ हेच त्यावरचे दुसरे उत्तर आहे.