कामगारांच्या पीएफच्या रकमेचा अपहार केल्याने निगडीतील कंपनीच्या चौघा संचालकांवर गुन्हा

0
1399

निगडी, दि. ३१ (पीसीबी) – चार वर्षांपासून कामागारांच्या पगारातून कपात केलेली पीएफची रक्कम कर्मचारी भविष्य निधी संघटन क्षेत्रीय कार्यालयामध्ये न भरता त्या रकमेचा अपहार केल्याने कंपनीच्या चौघा संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रोव्हीडंन्ट फन्ड इन्सपेक्टर अजय जगन्नथ गणवीर यांनी स्वत: कंपनीतल्या कागदपत्रांची तपासणी करुन निगडी पोलिसात गुन्हा दाखल केला. मे.एनव्हायरो बल्क हॅडलिंग सिस्टम प्रा.लि असे या कंपनीचे नाव आहे.

मिलिंद मधुकर दिक्षित (वय ४६, रा. फ्लॅट नं.१००, प्रथम सोसायटी, वाकड), प्रशांत मधुकर पप्पाल (वय ४७, रा. व्दारका से.२७ प्लॉट नं.३३२ प्राधिकरण पुणे-४४), सुजित गोपाल कुलकर्णी (वय ३९, रा. मंगरिष प्लॉट नं.४९४, सेक्टर.२७, प्राधिकरण, निगडी) आणि नितिन पुरषोत्तम सुपे (वय ४६, रा. प्लॉट नं.७, ब्लॉक नं.३, नेहरुनगर ईस्ट भिलाई, छत्तिसगड) असे गुन्हा दाखल झालेल्या कंपनीच्या चौघा संचालकांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मिलिंद, प्रशांत, सुजित आणि नितिन हे चौघे निगडीतील मे.एनव्हायरो बल्क हॅडलिंग सिस्टम प्रा.लि या कंपनीचे संचालक आहेत. प्रोव्हीडंन्ट फन्ड इन्सपेक्टर अजय गणवीर हे त्यांच्या कंपनीमध्ये पीएफच्या नियमित तपासणीसाठी मंगळवारी (दि.३०) गेले होते. यावेळी त्यांनी कंपनीचे पीएफ एकाऊंट तपासले असता कंपनीने त्यांच्या कंपनीतील कामगारांच्या पगारातून एप्रिल २०१५ के ऑगस्ट २०१८ या चार वर्षांची पीएफची एकूण १७ लाख ६१ हजार १९१ रुपयांची रक्कम कपात करुन घेतली. मात्र कंपनीने ती रक्कम कर्मचारी भविष्य निधी संघटन क्षेत्रीय कार्यालयामध्ये न भरता त्या रकमेचा अपहार करुन क्षेत्रीय कार्यालय आणि कामगारांची फसवणूक केली.

विशेष म्हणजे कंपनीने भविष्य निधी संघटन क्षेत्रीय कार्यालयात रजिस्ट्रेशन देखील केले आहे, त्याचा त्यांच्याकडे क्रमांक देखील आहे. तरी सुध्दा कंपनीच्या संचालकांनी आपसात संगणमत करुन कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधीचे पैशांचा अपहार केला. हि बाब लक्षात येताच प्रोव्हीडंन्ट फन्ड इन्सपेक्टर अजय गणवीर यांनी स्वत: कंपनीच्या चौघा संचालकांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार निगडी पोलीसांनी कंपनीच्या चौघा संचालकांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी संचालकांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. निगडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक एस.डब्ल्यू वाघमारे तपास करत आहेत.