Pimpri

कापड व्यापाऱ्याची 11 लाख 59 हजारांची फसवणूक

By PCB Author

February 24, 2022

वाकड, दि. २४ (पीसीबी) – क्रेडिटवर कापड व्यापा-याकडून बेडशीट, मॅट्रेस नेले. नेलेल्या मालाचे काही पैसे दिले. उर्वरित पैसे न देता व्यापा-याची 11 लाख 59 हजार 285 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 18 डिसेंबर 2021 ते 22 जानेवारी 2022 या कालावधीत वाकड परिसरात घडली.

व्हिक्टर जॉन पीटर (वय 46, रा. मुंबई पुणे रोड, दापोडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश योगेंद्रपाल पुरी असे नाव सांगणारा आणि अंकित जैन असे नाव सांगणा-या व्यक्तीच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बेडशीट, मॅट्रेसचे व्यापारी आहेत. त्यांचे प्राईम सेल्स कार्पोरेशन नावाचे दुकान आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 12 लाख 89 हजार 285 रुपयांचा बेडशीट आणि मॅट्रेस हा माल क्रेडिटवर नेला. त्यातील एक लाख 30 हजार रुपये आरोपींनी फिर्यादी यांना दिले. मात्र उर्वरित 11 लाख 59 हजार 285 रुपये न देता आरोपी माल घेऊन पळून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील तपास करीत आहेत.