Chinchwad

कात्रज-निगडी पीएमटी बसमध्ये सव्वापाच लाखांची चोरी

By PCB Author

May 22, 2019

निगडी, दि. २२ (पीसीबी) – कात्रज-निगडी या पीएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पाकिटातून २१३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख ३५ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना रविवारी (दि.१९) सकाळी साडेअकरा ते दीडच्या सुमारास कात्रज ते निगडी प्रवासादरम्यान घडली.

याप्रकरणी अंकिता नितेश साबळे (वय २५, रा. देहुगाव, ओंकार सोसायटी साईलक्ष्मी अपार्टमेंट फ्लॅट नं. २१०) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात २ महिला आणि एका पुरुषा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेअकरा ते दीडच्या सुमारास फिर्यादी अंकिता यांची आई या कात्रज-निगडी पीएमटी बसमधून प्रवास करत होत्या. यावेळी अज्ञात २ महिला आणि एका पुरुषाने फिर्यादी यांच्या आईच्याजवळ असलेल्या पाकिटातून २१३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख ३५ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक भोये तपास करत आहेत.