कात्रजमध्ये वीजेच्या जबरदस्त झटक्याने चिमुरड्याचे हातपाय झाले निकामी

0
335

कात्रज, दि. २२ (पीसीबी) – घराच्या टेरेसजवळील महावितरणाची उच्चदाबेच्या वीजवाहिनीचा जबरदस्त झटका बसल्याने एका साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याचे हातपाय निकामी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना (दि.१८ एप्रिल)  कात्रज परिसरात घडली.

आदी गणेश गायकवाड (वय साडेतीन वर्ष रा. आंबेडकर चौक, बोपोडी, औंध) असे हातपाय निकामी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडिल गणेश गायकवाड (वय २९) यांनी भारती विद्यापीठ पोलिसात फिर्याद आहे. त्यानुसार, पोलिसांनी घरमालक मनोज सोडमिसे  आणि महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, गणेश गायकवाड  हे कपडे शिवण्याचा व्यवसाय करतात. त्यांचे काका कात्रज येथील सच्चाईमाता नगर परिसरातील सोडमिसे यांच्या घरामध्ये भाड्याने राहण्यास होते. मागील एप्रिल महिन्यात १८ तारखेला गायकवाड, त्यांची पत्नी व मुलगा आदी असे तिघे जण काकांना भेटण्यासाठी सच्चाईनगर येथे गेले होते. सायंकाळी आदी खेळता-खेळता छतावर गेला. सोडमिसे यांच्या या घरालगतच विजेचे रोहित्र बसविले असून, त्याची वीजवाहिनी त्यांच्या घरावरून गेली आहे. खेळताना आदी याच्या हातामध्ये एक लोखंडी सळई होती. सळईचा स्पर्श वीजवाहिनीला लागल्यामुळे त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामध्ये त्याच्या हातापायांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला उपचारासाठी तत्काळ ससून रुग्णालयात नेण्यात आले. आदीचे हात व पाय गंभीर जखमी झाल्याने निकामी झाले. भारती विद्यापीठ पोलीस तपास करत आहेत.