कात्रजमध्ये पेस्ट कंट्रोलमुळे दोन कँटीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

0
590

पुणे, दि. ७ (पीसीबी) – खोलीत झालेले ढेकूण घालवण्यासाठी केलेल्या पेस्ट कंट्रोलमुळे दोघा कँटीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना कात्रजमधील एका महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये मंगळवारी (दि.५) घडली. 

अजय बेलदार ( वय. २० रा. जळगाव ) व अनंता खेडकर (वय.२० रा. बुलढाणा) अशी मृत्यू झालेल्या दोन कँटीन कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी याबाबत माहिती दिली की, कात्रजमधील एका महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये हे दोन तरुण काम करत होते. कँटीन मालकानेच त्यांना राहण्यासाठी एक खोली दिली होती. या खोलीत ढेकूण झाल्याने तीन दिवसांपूर्वी खोलीत पेस्ट कंट्रोल करून खोली पूर्णपणे पॅकबंद करण्यात आली होती. त्यानंतर ते दोघेजण तीन दिवस एका मित्राच्या घरी जाऊन राहिले होते. मंगळवारी रात्री ते परत आपल्या खोलीवर येऊन झोपले.

बुधवारी बराच वेळ झाला तरी कामावर न आल्याने कॅन्टीनच्या व्यवस्थापकाने  त्यांच्या खोलीवर येऊन पाहिले असता दरवाजा आतून बंद होता. खिडकीतून पाहिले असता दोघेही झोपलेले आढळून आले. त्यानंतर  दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि दोघांनाही रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.