Desh

काँग्रेस संपलीच पाहिजे- योगेंद्र यादव

By PCB Author

May 20, 2019

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपाला रोखू शकत नसेल तर काँग्रेस संपलीच पाहिजे असे मत प्रसिद्ध समाजसेवक आणि निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले आहे. भारताच्या इतिहासात काँग्रेसची सकारात्मक भूमिका नव्हती. आज अन्य पर्याय निर्माण होण्यामध्ये काँग्रेस एकमेव सर्वात मोठा अडथळा आहे असे योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे.

भारताच्या इतिहासात काँग्रेसची सकारात्मक भूमिका नव्हती यावरुन गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे योगेंद्र यादव यांनी त्यावर स्पष्टीकरणही दिले आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर काँग्रेसची महत्वपूर्ण भूमिका मी नाकारलेली नाही. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की, काँग्रेसला इतिहासात सकारात्मक भूमिका उरणार नाही.

रविवारी लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान संपले. त्यानंतर विविध एक्झिट पोल्सच्या चाचण्यांमध्ये भाजपा प्रणीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आले आहेत. पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या उत्तरात योगेंद्र यादव यांनी हे मत व्यक्त केले. योगेंद्र यादव प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आहेत. वेगवेगळया निवडणुकांच्या जय-पराजयाचे विश्लेषण करण्यात ते तज्ञ आहेत.