Maharashtra

काँग्रेस, राष्ट्रवादी प्रकाश आंबेडकरांना ८ जागा सोडणार?  

By PCB Author

February 06, 2019

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – आगामी  लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी  सुरु केली आहे.  जागावाटप उरकून घेण्यासाठी पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी  यांची आघाडी निश्चित असून दोन्ही पक्ष प्रत्येकी २० – २० जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर ८ जागा वंचित बहुजन आघाडीला सोडण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला शह देण्यासाठी विरोधकांनी  मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडीत समविचारी पक्षांना  सामील करून घेण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. या महाआघाडीत भारिपचे प्रमुख  प्रकाश आंबेडकर यांना देखील स्थान देण्यात आले आहे. आता राष्ट्रवादीने ४ काँग्रेसने ४ अशा एकूण ८ जागा भारिपला सोडण्याची तयारी दर्शवली आहे.  यामुळे महाआघाडीला  बळ मिळणार आहे.

दरम्यान, प्रकश आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये भाजपला हरवण्याची ताकद नाही, असे म्हटले होते.     काँग्रेसला आम्हाला महाआघाडीत घ्यावेच लागणार  आहे, असे सांगून काँग्रेसने आम्हाला १२ जागा सोडाव्यात, अशी मागणी लावून धरली होती. मात्र, काँग्रेसने दोन पावले मागे घेत ८ जागा देण्याची तयारी दाखवल्याचे समजते.