काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत नारायण राणेंना स्थान नाही – अशोक चव्हाण   

0
911

मुंबई,  दि. ८ (पीसीबी) – स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे भाजपबरोबरही  सूत जमण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे राणे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र,  राष्ट्रवादी व राणे यांच्या या संभाव्य आघाडीला काँग्रेसचा विरोध  असेल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.  

या आघाडीबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, कोकणातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा राणेंना पुन्हा सोबत घेण्यास विरोध आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या हातमिळवणीस काँग्रेसचा विरोध असेल, असे ते म्हणाले.

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढली, तर राणेंसोबत युती करण्याची भाजपची रणनीती आहे.  मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेची युती होण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांकडून सकारात्मक विधाने येत आहेत. त्यातच शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडूनही भाजपबाबत मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राणे यांची राजकीय कोंडी झाली आहे. त्यामुळे राणे यांनी राष्ट्रवादीशी  घरोबा करण्याच्या पर्यायावर विचार सुरू केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राणेंच्या कणकवली येथील घरी भेट दिल्याने या शक्यतेला अधिकच बळ मिळत आहे.