Maharashtra

काँग्रेस- राष्ट्रवादीला चार जागांचा फटका; भाजप, सेनेचे संख्याबळ वाढणार!

By PCB Author

June 25, 2018

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – विधानसभा सदस्यांमधून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै राेजी निवडणूक हाेत अाहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता अपक्षांच्या मदतीने भाजप पाच जागांवर विजय मिळवू शकतो, त्यामुळे सध्या २१ जागांवर असलेला भाजप २४ जागांवर जाईल तर राष्ट्रवादीला तीन जागांचे नुकसान होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेची संख्याही ११ वर गेली असून त्यांना आणखी एका जागेचा लाभ होऊ शकताे. राष्ट्रवादीचे संख्याबळ काँग्रेसपेक्षा कमी होणार असल्याने विरोधी पक्षनेतेपदावरून दोन्ही पक्ष आमने-सामने येण्याची चिन्हे अाहेत.

सुनील तटकरे, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडित आणि जयदेव गायकवाड (राष्ट्रवादी), विजय गिरकर (भाजप), माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे (काँग्रेस), महादेव जानकर (रासपा- भाजप), अनिल परब (शिवसेना) आणि शेकापचे जयंत पाटील यांची मुदत जुलैमध्ये संपुष्टात येत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर विधान परिषदेत भाजपचे संख्याबळ २१ वर तर शिवसेनेचे ११ वर पोहोचले आहे. राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळवल्याने २० वर आले आहे तर काँग्रेसचे संख्याबळ १८ वर आले आहे.

विधानसभेत भाजपचे संख्याबळ १२३ असून शिवसेना ६३, काँग्रेस ४२ आणि राष्ट्रवादीचे संख्याबळ ४१ आहे. विधान परिषदेत निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीची २७ मते आवश्यक आहेत. भाजपचे सध्याचे संख्याबळ पाहता अपक्ष आणि शिवसेनेच्या उरलेल्या मतांच्या पाठिंब्याने पाच जागा जिंकणे त्यांना शक्य अाहे. त्यामुळे त्यांना तीन जागांचा फायदा हाेऊ शकताे. शिवसेनेचे संख्याबळ ६३ अाहे. त्यांचेही दोन उमेदवार आरामात निवडून येऊ शकतात, उलट त्यांच्याकडे काही मते शिल्लकही राहतात. काँग्रेस व राष्ट्रवादीचे एकत्रित संख्याबळ ८३ असल्याने त्यांचे तीनच उमेदवार निवडून येऊ शकतात. परंतु यावेळी काँग्रेसला दोन जागा सोडण्यात येणार असल्याने राष्ट्रवादीला फक्त एकाच जागेवर विजय मिळणार आहे.