काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ताकाळात स्वतःची घरे भरली व बगलबच्च्यांना पोसले; मंत्री पंकजा मुंडे यांचा घणाघात

0
2653

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – ७० वर्षे झाली स्वातंत्र्याला. एवढ्या वर्षात सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने काय केले?, असा सवाल ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (दि. ८) भोसरी येथे केला. काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वतःची घरे भरण्याचे काम केले. बगलबच्च्यांना पोसण्याचे काम केले, अशी जोरदार टिकाही त्यांनी केली.

आमदार महेश लांडगे यांच्या वतीने भोसरीतील गावजत्रा मैदानावर आयोजित इंद्रायणी थडीचे उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह भाजपचे भोसरी मतदारसंघातील सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, “काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे सत्ता उपभोगली. त्यांनी केवळ स्वतःची घरे भरण्याचे आणि बगलबच्च्यांना  पोसण्याचे काम केले. आमच्या राज्यात आम्ही सामान्य माणसाला छत, शौचालय देत आहोत. थेट त्यांच्या बँकेत लाभ देतो. दलालांची फौज आम्ही संपवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्यांसाठी किती तरी योजना आणल्या. गॅस घेणे म्हणजे अग्निदिव्य पार पाडावे लागत होते. परंतु, त्यांनी उज्वला योजना आणून सामान्य महिलांचे भले होत आहे. मी मंत्रिपदाच्या काळात माझ्या मुलींना, महिलांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी काम केले. बचत गटाची चळवळ उभी करण्याचे काम केले. मंत्रिपदाच्या खुर्चीसाठी राजकारणात नाही. माझ्या वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजकारणात आहे. त्यांचे स्वप्न वंचित व पीडितांना मदत करण्याचे होते. भोसरीचे आमदार महेश लांडगे आता आमच्यासोबत आहेत. ते या भागाचा विकास करण्यासाठी धडपडत असतात. त्यांना भाजपच्या बरोबरच ठेवून त्यांची आम्ही ताकद वाढवणार  असल्याचे त्यांनी सांगितले.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वीनल म्हेत्रे यांनी केले. महापौर राहुल जाधव यांनी आभार मानले.