काँग्रेस-राष्ट्रवादीत प्रवेश करा, मंत्रिपद मिळवा; शिवसेना-भाजपच्या निष्ठावान आमदारांना अजित पवारांची ऑफर 

0
562

मुंबई, दि. २० (पीसीबी) – शिवसेना – भाजप युतीचे आमदार निवडून येऊन काय फायदा नाही. कारण मंत्रिपद बाहेरील आयाराम गयाराम आमदारांना दिले जात आहे.  त्यामुळे सेना भाजप आमदारांनी आता काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करावा आणि राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला की पुन्हा आपल्या पक्षात प्रवेश करावा म्हणजे मंत्रीपद मिळेल, असा उपरोधिक सल्ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी  शिवसेनेतील आमदारांना दिला आहे.

अजित पवार यांनी राधाकृष्ण विखेंवर देखील यावेळी निशाणा साधला. विखे आमच्या बाजूला होते, तेव्हा मुंबईच्या डीपी घोटाळ्याबाबत आरोप केला होता. १ लाख कोटीचा घोटाळा डीपीमध्ये झाला असून त्यातून १० हजार कोटी रुपये मुख्यमंत्री कार्यालयाला मिळाल्याचा आरोप विखेंनी केला होता. आता विखे गृहनिर्माण खात्याचे मंत्री झाले आहेत त्यांनी आता त्यांच्या आरोपांवर खुलासा करावा आणि मुख्यमंत्र्यानीही याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशीही मागणी पवारांनी केली.

दरम्यान, शिवसेनेने निष्ठावान शिवसैनिकांना डावलून जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद दिले. हा सामान्य शिवसैनिकांवर अन्याय आहे. त्यांनी किती काळ तुमच्या सतरंज्या उचलायच्या, असा टोलाही अजित पवार यांनी शिवसेना पक्ष प्रमुख  उद्धव ठाकरे यांना  लगावला.