काँग्रेस म्हणजे बेशिस्तांचे नंदनवन; थेट राहुल गांधींसमोर घरचा आहेर

0
610

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – पक्षातील कार्यकर्त्यांचे बेशिस्त वर्तन आणि वरिष्ठ नेत्यांच्या अहंकार आणि लॉबीमुळे समस्या निर्माण होत आहे, अशी तक्रार काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी थेट अध्यक्ष राहुल गांधींकडेच केली आहे. वेगवेगळ्या राज्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी राहुल गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त करत पक्षाला घऱचा आहेर दिला आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी पक्ष बांधणीसाठी पक्षाच्या काही सदस्यांशी फोनवरुन संवाद साधला. यामध्ये जिल्हाध्यक्षांचाही समावेश होता. राहुल गांधी यांनी यावेळी जिल्हास्तरीय पक्षाची काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. चर्चेदरम्यान जिल्हाध्यक्षांनी राहुल गांधी यांना पक्षातील काही वरिष्ठ नेते अहंकारी असून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची तसदी घेत नसल्याची तक्रार केली.

पुढे बोलताना त्यांनी जिल्हास्तरीय नेते शिस्त राखण्यात अपयशी ठरत असून वरिष्ठ नेत्यांनी शिफारस केलेल्या लोकांना आयात केले जात असल्याचा आरोप केला. तसेच ज्यांना पक्षात घेतले जात आहे त्यांना जिल्हा समितीची काही चिंता नसल्याचाही आरोप त्यांनी केला. पश्चिम बंगालमधील जलपैगुडी येथील एका जिल्हा सदस्याने तर काँग्रेस नेत्यांना खूप मोठा अहंकार असून, लोकांना भेटण्यात त्यांना काहीच रस नाही ज्याचा परिणाम पक्षावर होत असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी राहुल गांधींकडे पश्चिम बंगालमधून निवडणूक लढण्याची विनंतीही केली.