Maharashtra

काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार ?

By PCB Author

March 21, 2019

मुंबई, दि. २१ (पीसीबी) –  काँग्रेस- राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांचे भाजप प्रवेशाचे सत्र कायम राहिण्याची शक्यता आहे. कारण  काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे सुजय विखे-पाटील यांच्यानंतर पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यास काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश  केल्यास त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात  रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे.  बारामती लोकसभा मतदारसंघातून स्वतः हर्षवर्धन किंवा त्यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवार असू शकतात. राष्टवादीचे नेते अजित पवार यांनी आघाडीत बिघाडी झाली, तरी चालेल पण इंदापूरमधून दत्तात्रय भरणे हेच लढणार, अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे  हर्षवर्धन पाटील अस्वस्थ  झाले आहेत.

दरम्यान,  काँग्रेसचा इंदापूरमध्ये मेळावा झाला होता. या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण   उपस्थित होते. या संपूर्ण मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांवर जबरदस्त टीका करण्यात आली होती.  रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश झाल्यावरही इंदापूरमध्ये  फटाके फोडण्यात आले होते.