Videsh

काँग्रेस अध्यक्षपदी मल्लीकार्जुन खरगे यांची बाजी !

By PCB Author

October 19, 2022

– राहुल गांधी यांनी अगोदरच केले होते सुतोवाच नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी खासदार शशी थरुर यांचा पराभव केला आहे. मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष झाले आहेत. खरगेंंना ७८९७ तर, थरुर यांना १०७२ मते मिळाली आहेत. ४१६ मते बाद करण्यात आली आहे. खरगे हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय आणि विश्वासू नेते समजले जातात. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निकालाच्या आधीच खरगे यांचा अध्यक्ष म्हणून उल्लेख केला होता. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ आंध्रप्रदेश राज्यात पोहचली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी कुर्नूल येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राहुल गांधींना भविष्यात पक्षात मिळणाऱ्या नव्या जबाबदारीवर प्रश्न विचारला. त्यावर राहुल गांधी म्हणाले, “काँग्रेस अध्यक्ष यावरती निर्णय घेतील, याबद्दल खरगेजींना विचारा. काँग्रेस अध्यक्ष आमचे सर्वोच्च नेते आहेत. मी अध्यक्षांना माझ्या कामाचा अहवाल सादर करेल. तेच पक्षात मला कोणती जबाबदारी द्यायची ठरवतील,” असे राहुल गांधींनी सांगितलं. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोमवारी ( १७ ऑक्टोंबर ) मतदान पार पडलं. त्यासाठी बुधवारी ( १९ ऑक्टोंबर ) मतमोजणी होणार होती. अध्यक्षपदी खरगे की थरुर यापैकी कोणाला कौल मिळतो हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार होते. मात्र, त्यापूर्वीच राहुल गांधी खरगेजी माझ्याबाबत निर्णय घेतील, असे बोलून गेले. त्यांच्या वक्तव्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ९४ टक्के मतदान झालं होते. देशातील एकून ६८ मतदान केंद्रावर ९५०० हून अधिक प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला होता. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, राहुल गांधी, प्रियांका गांधी, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि अन्य प्रमुख नेत्यांनी यासाठी मतदान केले होते. अखेर आज २४ वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेर अध्यक्ष मिळाला आहे.