Desh

काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे की सुशीलकुमार शिंदे ?

By PCB Author

July 04, 2019

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारुन राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकारी समितीला लवकरच त्यांच्याजागी नव्या अध्यक्षाची निवड करावी लागणार आहे. यापूर्वी नव्वदच्या दशकात राजीव गांधी यांच्यानंतर पी.व्ही. नरसिंह राव आणि सीताराम केसरी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते.

सध्या काँग्रेस अध्यक्षपदासाठी कर्नाटकातील नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि महाराष्ट्रातून सुशीलकुमार शिंदे यांची नावे आघाडीवर आहेत. भविष्यातील संघटनात्मक बदलांसाठी काँग्रेस नेत्यांच्या बुधवारपासून बैठका सुरु झाल्या आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांची दलित पार्श्वभूमी आहे तसेच ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. गांधी कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास आहे. मागच्या लोकसभेमध्ये ते काँग्रेसचे नेते होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गलबर्गामधुन त्यांचा पराभव झाला असला तरी गांधी कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळयात पडू शकते.

खर्गेंच्या बरोबरीने महाराष्ट्रातून सुशीलकुमार शिंदे यांचे नावाही काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. सुशीलकुमार शिंदे सुद्धा गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेनुसार काँग्रेसची कार्यकारी समिती हंगामी अध्यक्षाची निवड करेल त्यानंतर देशभर पक्षांतर्गत मतदानातून नवीन अध्यक्ष निवडला जाईल.