Banner News

काँग्रेसला धक्का; हर्षवर्धन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

By PCB Author

September 11, 2019

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री  हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज (बुधवार) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

भाजप प्रवेशानंतर पाटील म्हणाले की, निष्ठेने वागायचे असेल, तर भाजपाशिवाय पर्याय नाही. मी कोणतीही अट घालून भाजपमध्ये आलेलो नाही. पक्ष देईल ती जबाबदारी मी सांभाळायला तयार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभर दिवसात अनेक धाडसी निर्णय घेतले यात काहीही शंका नाही, असे सांगून त्यांनी मोदी सरकारच्या धाडसी निर्णयांचे कौतुकही केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा अनुभवी नेता भाजपमध्ये आल्याने भाजपाचे बळ वाढेल.  पाच वर्षांपासून हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाची वाट बघत होतो. संसदीय कार्यमंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी प्रदीर्घ काळ काम केले आहे. सर्वांना सोबत घेण्याची हातोटी त्यांच्याजवळ आहे त्याचा उपयोग आम्हाला निश्चितपणे होईल. त्यांच्या गाठीशी जो अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा भाजपाला आणि युती सरकारला मिळेल ,  असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी  इंदापूरात  एक मेळावा घेऊन भाजप प्रवेश करण्याबाबत कार्यकर्त्यांची मते आजमवली होती. या मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांवर टीका केली होती. पवार कुटुंबियांचा आतापर्यंत खूप अन्याय सहन केला. आता आमचा आक्रमकपणा बघा, असा इशारा त्यांनी या मेळाव्यात दिला होता.