Maharashtra

काँग्रेसमध्ये स्वबळाचा सूर; अजित पवार म्हणतात…

By PCB Author

June 08, 2019

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढू, असे मत व्यक्त करणाऱ्यांच्या मताला काहीही किंमत नाही. आम्ही काँग्रेसला मदत केली,  हे त्यांच्या निवडून आलेल्या खासदारांना विचारा. एकत्रच राहील पाहिजे त्यातच दोघांचेही भले आहे,  असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या बैठकीत काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढावी, असे मत काही नेते व्यक्त केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, काँग्रेसने काय चर्चा करावी, हा काँग्रेसचा विषय आहे. पण बैठकीनंतर असेच लोक बोलतात की जे कुठे नगरपालिके मध्येही निवडून येणार नाहीत. स्वतंत्र लढण्याची भाषा बोलणाऱ्यांना काहीही किंमत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेसची पहिलीच चिंतन बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याची मागणी  काही नेत्यांनी केली. तसेच  राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात सूर आळविण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला मदत करते. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको, असा सूर देखील या बैठकीमध्ये निघाला. वंचित बहुजन बरोबर आघाडी करावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.